आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सिव्हिल’ विरोधात सेना-मनसे आक्रमक; दोषींवर कारवाई करण्याचे डॉ. किरण पाटील यांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील गचाळ कारभार, रुग्णांना होणारा त्रास आणि रविवारी रात्री प्रसूती वॉर्ड क्रमांक सहामधील स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिव्हिलमध्ये आंदोलन केले.

सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक नितीन नन्नवरे, संतोष पाटील, चंदन कोल्हे, बंटी जोशी, वैशाली विसपुते, जया सोनवणे, जयश्री जोशी यांच्यासह कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. नवीन इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यामुळे हे काम करणारा ठेकेदार व संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच अर्ध्या तासानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक चेतन शिरसाळे, बबलू पिपरिया, राहुल नेतलेकर, सोहम् विसपुते, कुलभूषण पाटील, भय्या देवरे, विक्की सपकाळे, कांती कानडे आदींसह शिवसैनिकही रुग्णालयात दाखल झाले. या घटनेत दोषी आढळून येणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान, सुमारे दीड तास सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.
अशा होत्या मनसेच्या मागण्या
- प्लास्टर कोसळल्याच्या या घटनेतील दोषींवर कारवाई करा.
- बंद पडलेले सीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करा.
- सिव्हिलच्या कर्मचार्‍यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी सौजन्याने वागावे.
- रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे.
अशा होत्या शिवसेनेच्या मागण्या
- संबंधित ठेकेदार व अभियंत्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा.
- बंद पडलेल्या लिफ्टचे ठेकेदाराला पैसे दिले जात आहेत; परंतु लिफ्ट सुरू होत नाही. ती त्वरित सुरू करा.
- रुग्णालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे एक्स्पे्रस फीडर त्वरित सुरू करावे.
- रुग्णांची गैरसोय त्वरित थांबवा.
काय घडली घटना?
रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील प्रसूती वॉर्ड क्रमांक सहामधील स्लॅबचे प्लास्टर रविवारी कोसळले. त्यात गरोदर महिला नर्गिस शेख शोएबच्या पोटावर व डोक्यावर प्लास्टरचे तुकडे पडल्याने ती जखमी झाली. तसेच संगीता सोनवणे आणि आरती राठोड यांच्या हात व डोक्याला मार लागला, तर रुग्णाच्या नातेवाईक कुबराबी शेख मोईनोद्दीन यांचा कान कापला गेला. चार महिन्यांतील सिव्हिलमधील ही तिसरी घटना आहे.