आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ पालिका रुग्णालयातच अस्वच्छतेचा कळस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी पदभार घेताच पालिका रुग्णालयाची पाहणी केली होती. या भेटीत पदाधिका-यांसमोर रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. मात्र, भेटीला 15 दिवस उलटूनही ही समस्या सुटलेली नाही. रुग्णालयातच अस्वच्छतेने कळस गाठल्याने उपचारासाठी येणा-या रुग्णांसोबत कर्मचा-यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शहरातील जामनेर रोडवरील दीनदयालनगर, सिंधी कॉलनी, स्टेशन रोड, म्युनिसिपल पार्क, शिवाजीनगर, गडकरीनगर, मॉडर्न रोड, आठवडे बाजारातील कच-याचे दैनंदिन संकलन होत नाही. आता सुरू असलेल्या पावसामुळे या कच-याची लगेच दुर्गंधी सुटते. शिवाय अस्वच्छतेमुळे डासांचा उपद्रव वाढला असून साथीचे आजार पसरण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. ही शहरातील स्थिती असली तरी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्र संत गाडगेबाबा महाराज यांचे नाव असलेल्या पालिका रुग्णालयातही वेगळे चित्र नाही. अस्वच्छतेने कळस गाठला आहे.

भेट निरर्थकच
नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, उपनगराध्यक्ष विजय चौधरी यांनी पदभार स्वीकारताच पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयाची भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या होत्या. या वेळी सर्व कर्मचा-यांनी अस्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, पदाधिका-यांनी भेट देऊन 15 दिवस झाले, तरीही रुग्णालयातील चित्र बदललेले नाही.

दुर्गंधीचा त्रास कायम
- साचलेला कचरा पावसामुळे कुजून दुर्गंधी सुटते. शिवाय डासांचा उपद्रव वाढल्याने मलेरियाची भीती आहे. पालिकेने शहरात स्वच्छता मोहीम आणि धूरळणी करावी. दिलीप शिंगारे, रहिवासी, भुसावळ