आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस्कॉर्ट बंदच्या निर्णयामुळे मनपाच्या अडचणी वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका क्षेत्रातून जाणा-या मालवाहू वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारी एस्कॉर्ट फी 16 ऑगस्टपासून बंद होणार आहे. वर्षाकाठी मिळणारे 14 कोटी 95 लाख रुपयांचे उत्पन्न बंद होणार असल्याने पालिकेच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. एस्कॉर्टसाठी नियुक्त केलेले 57 क र्मचा-यांना प्रशासनातर्फे इतरत्र वर्ग करावे लागणार आहे.

महापालिकेने विविध योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उभा करावा लागतो. न्यायालयात सुरू असलेल्या गाळे लिलावासह इतर दाव्यांमुळे पालिका प्रशासन आधिच अडचणीत आले आहे. या सर्व परिस्थीतीत एलबीटी सुरू ठेवायची की रद्द करावी, यासंदर्भात सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसल्याने पुढे काय या मुद्यावरुन प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. एकामागे एक अडचणी वाढत असताना एस्कॉर्ट वसुली बंदचा निर्णय घेण्यात आल्यामुळे पालिकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. एस्कॉर्टच्या माध्यमातून पालिकेला वर्षाकाठी 14 कोटी 95 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सध्या पालिकेकडे स्वउत्पन्नाचे स्त्रोत तोडके असून ते देखील बंद होत नसल्याने पालिका चालवायची कशी? याबाबत मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
एस्कॉर्टसाठी नियुक्त कर्मचारी होणार आपापल्या विभागात वर्ग

एस्कॉर्टची वसुली 16 ऑगस्टपासून बंद होणार आहे. सध्या ठेका नसला तरी ठेकेदाराकडील कर्मचा-यांकडूनच वसुली सुरू असल्याची ओरड वाहनधारकांकडून केली जाते. त्यामुळे आगामी काळात पालिकेने एस्कॉर्टसाठी नियुक्त केलेल्या 57 कर्मचा-यांना आपापल्या विभागात किंवा इतर विभागांमध्ये वर्ग करावे लागणार आहे. यापूर्वी एस्कॉर्टच्या उत्पन्नातून कर्मचा-यांच्या पगारासाठी मदत होत होती. परंतु आगामी काळात मनपाला अन्य पर्यायांचा शोध घ्यावा लागेल हे निश्चित आहे.

सफाई मक्तेदार नकार देण्याची शक्यता
शहरातील वॉर्ड क्रमांक 5, 11, 16, 17, 18, 19, 25, 26, 27, 28, 29, 36 व 37 अशा 13 वॉर्डात मक्तेदारामार्फत सफाईचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. नुकतीच स्थायी समितीने यास मंजुरी दिली आहे. प्रत्येक वॉर्डासाठी 3 लाख 40 हजार रुपयेप्रमाणे 13 वॉर्डांसाठी दरमहा 44 लाख 20 हजार रुपये खर्च येणार आहे. मात्र एस्कॉर्ट बंद होणार असल्याचे कळताच पैसे निघतील की नाही या भीतीने निविदा भरलेल्यांकडून नकार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.