आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे, सोन्याचे दागिने, रुखवत खरेदीसाठी गर्दी; बॅण्ड, मंडप, कार्यालयांच्या बुकिंगच्या तारखाही फुल्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कापड दुकानासमोर लग्नाचा बस्ता खरेदीसाठी झालेली नागरिकांची गर्दी. - Divya Marathi
कापड दुकानासमोर लग्नाचा बस्ता खरेदीसाठी झालेली नागरिकांची गर्दी.
जळगाव- लग्नतिथीसुरू झाल्यापासून शहरातील फुले मार्केट परिसरात कपडे, सोन्याचे दागिने, रुखवत आधी वस्तू खरेदीला उधाण आले आहे. यामुळे परिसरात जागोजागी रस्त्यांवर वऱ्हाडी मंडळींची गर्दी दिसून येत आहे. खरेदीदारांच्या गर्दीमुळे टॉवर चौक, बळीरामपेठ, दाणा बाजार, जुने बसस्थानकाकडील रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली आहे. संपूर्ण मे जून महिन्यातील तारखा लग्न सोहळ्याच्या असल्याने आधीच बॅन्ड, मंडप, आचारी, कार्यालये यांच्या बुकिंगच्या तारखाही फुल्ल आहेत. 

लग्नसराईचे दिवस सध्या सुरू असून मे जून महिन्यात लग्नतिथी दांडगी आहे. त्यामुळे शहरातील फुले मार्केट, केळकर मार्केट, बळीरामपेठ, टॉवर चौकातील दुकानांमध्ये वधू-वराकडील मंडळी वस्तू खरेदीसाठी गर्दी करीत आहे. तसेच लग्न बस्त्यासाठी आलेली मंडळीही घोळक्याने पसंतीनुसार कपडे खरेदी करीत आहेत. यात विशेष करून आजूबाजूच्या तालुक्यांमधील ग्रामीण भागातील मंडळी खरेदीसाठी येत आहेत. या गर्दीमुळे शहराच्या मुख्य बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी होऊन ध्वनी वायूप्रदूषण वाढले अाहे. तसेच रस्त्यावरच वाहने पार्क झाल्याने हॉकर्सने रस्त्यावरच दुकाने मांडल्यानेही वाहतुकीस अडथळा येत आहे. 
 
एकाच ठिकाणी वस्तू खरेदीवर भर 
शक्यताे एकाच छताखाली मिळणाऱ्या कपड्यांच्या दुकानांना अधिक पसंती नागरिकांकडून मिळत अाहे. वधू-वरांचे कपडे एकाच दुकानातून घेतले जातात. तर इतरांना अाहेराच्या साड्या या पसंतीनुसार घेतल्या जातात. शहरातील अनेक माेठे दुकाने हे टाॅवर चाैक परिसरात असल्याने या संपूर्ण परिसरातच बस्ता खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. 
 
शीतपेयांची विक्री वाढली 
शहरात ४५ अंशावर तापमान असूनदेखील नागरिकांची वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. भल्या माेठ्या पिशव्या घेत, डाेक्यावर रुमाल बांधून अनेक जण खरेदी करताना पाहायला मिळतात. तर एखाद्या दुकानात अगोदरपासूनच गर्दी असेल तर काही ग्राहकांना बाहेरच थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील दुकानांमध्ये शीतपेयांची मोठी विक्री वाढली आहे. 
बातम्या आणखी आहेत...