आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृती समितीची चर्चा फिस्कटली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील संतोषीमाता पतसंस्थेच्या ठेवीदारांना 90 लाखांच्या ठेवी परत करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ठेवीदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या याद्यांचा घोळ सुरू असल्याने ठेवीदारांच्या रकमा परत देताना अडचणी येत आहेत. याच मुद्यावरून तालुकास्तरीय कृती समितीची बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेली बैठकीतील चर्चा फिस्कटली. याबाबत आता 26 जून रोजी होणार्‍या समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सहायक निबंधक आर.आर.शेरे, सहकार अधिकारी आय.बी.तडवी, पोलिस निरीक्षक दिलीप पगारे, प्रवीणसिंग पाटील, संध्या चित्ते, अश्विनी डोलारे, गोपाळ राऊत, पंडित रविओम शर्मा यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठक सुरू झाल्यावर प्रांताधिकारी मुंडके यांनी ठेवीदारांची यादी आणि ठेवीच्या रकमांचे वाचन केले. काही ठेवीदारांची नावे यादीत नसल्याने अश्विनी डोलारे व गोपाळ राऊत यांनी आक्षेप घेतला.

यादीनुसारच शासन ठरवेल त्याप्रमाणे ठेवीच्या रकमा अदा करा, असा मुद्दा प्रवीणसिंग पाटील यांनी मांडला. कृती समितीच्या बैठकीच्या प्रोसिडिंगची नक्कल मिळावी, अशी मागणी गोपाळ राऊत यांनी केली. ठेवीदार संघटनांची नोंदणी झाली आहे की नाही? याबाबत लेखी माहिती द्यावी, अशा आशयाची लेखी माहिती कळवण्याच्या सूचना प्रांताधिकार्‍यांनी सहायक निबंधकांना दिल्या. तसेच याबाबत धर्मादाय आयुक्तांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठेवीदार संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी वस्तुनिष्ठ माहिती पुरवावी, अन्यथा बैठकीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात येईल. तालुकास्तरीय कृती समितीत सादर झालेल्या यादीनुसारच ठेवीदारांना ठेवीच्या रकमा दिल्या जातील, असेही त्यांनी सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले.