आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ तालुक्यातील 16 सहकारी संस्था अवसायनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- सहकारी संस्थांमधील स्वाहाकाराचा परिणाम ठेवीदार-ग्राहकांवर झाला आहे. अनियमितता वाढल्याने सहकार विभागाने वेळीच सूचना देऊनही उपयोग होत नाही,तसेच उत्तरे देण्याऐवजी संस्थांची कार्यालये बंद ठेवली जातात. मात्र, या संस्थांविरूद्ध आता सहकार विभागाने कायद्याचे हत्यार उपसले आहे. सहायक निबंधकांनी तालुक्यातील 16 सहकारी संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

पतसंस्थांमुळे भुसावळ शहर आणि तालुक्यातील सहकार चळवळ कधीच मोडीत निघाली आहे. पतसंस्थांमध्ये शेकडो कोटी रुपये अडकल्याने त्रस्त असलेल्या ठेवीदारांनी कधी वैयक्तिक, तर कधी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले. अर्ज-विनंतीसह मोर्चे, उपोषण केले. मात्र, त्यांचा पैसा परत मिळालेला नाही. तसेच पतसंस्थांप्रमाणेच जागोजागी उभ्या राहिलेल्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांनी ग्राहकांची दिशाभूल केलेली आहे. या संस्थांची सद्यस्थिती, कामकाज, लेखापरीक्षण यासारखी महत्त्वाची माहिती मिळत नसल्याने खुद्द सहकार विभागाने कपाळावर हात मारून घेतला आहे. काही संस्थांची तर कार्यालयेच जागेवर नाहीत. या मुळे सहकार विभागाने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तालुक्यातील 16 सहकारी संस्थांवर अवसायक नियुक्त करण्यासाठी सहायक निबंधक शेरे यांनी प्रस्ताव तयार केला असून यानुसार कृती होणार आहे. उद्देशानुसार कामकाज न चालणे व अनियमितता हीच कारवाईमागील कारणे आहेत. यासाठी 22 जुलैला सुनावणी झाली. ग्राहक संस्था, महिला ग्राहक संस्था, महिला उद्योग संस्था, विविध कार्यकारी सोसायटी, पीक संरक्षण संस्था आदींचा यात समावेश आहे.

फक्त नोंदणी, कामे नाही
शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या नोंदणीकृत संस्थांची संख्या 320 पेक्षा जास्त आहे. मात्र, यापैकी बहुतांश संस्थांची फक्त नोंदणी झालेली आहे, प्रत्यक्ष कामकाजाचा पत्ता नाही. ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सहकार विभाग अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहेत. कामकाजात अनियमितता आढळल्यास किंवा नोंदणीकृत पत्त्यावर कार्यालय न आढळणार्‍या संस्था अवसायनात काढण्यासाठीचे प्रस्ताव तयार होतील.

सहकारी संस्था अशा
झेडटीएस कंझुमर सहकारी सोसायटी, सहजीवन गृहनिर्माण सहकारी सोसायटी, जय अंबे कंझुमर सहकारी संस्था, नालंदा मागासवर्गीय सहकारी संस्था, जयर्शी महिला ग्राहक सहकारी संस्था, जनता को. ऑप. कंझुमर सहकारी संस्था, रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी संस्था, अफसाना महिला उद्योग सोसायटी, महालक्ष्मी माता महिला उद्योग सोसायटी, सप्तशृंगी महिला सहकारी ग्राहक संस्था (भुसावळ), वरणगाव पीपल्स कंझुमर सहकारी संस्था, किसान पीक संरक्षण संस्था (किन्ही बुद्रूक), पिंप्रीसेकम, काहूरखेडा, शिंदी आणि साकरी येथील पीक संरक्षण सहकारी संस्था अवसायनात काढण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक निबंधक आर.आर.शेरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

पुढील महिन्यात होणार निर्णय
संतोषी माता सहकारी पतसंस्थेमधील 90 लाख रुपयांचे ठेवीदारांना वाटप करण्यासाठी तत्कालीन प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी ठेवीदार समितीच्या पदाधिकार्‍यांची दोन वेळा बैठक घेतली. मात्र, ठेवी परत देण्यास पात्र ठेवीदारांच्या यादीवर एकमत झाले नाही. यानंतर त्यांनी ठेवीदारांच्या याद्यांची लेखापरीक्षकांकडून तपासणीचे आदेश दिले. मात्र, आता प्रांत मुंडके यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर बदलून आलेले नवीन प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे काय भूमिका घेतात? याकडे ठेवीदारांचे लक्ष आहे. सध्या त्यांच्याकडे जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी असल्याने हा तिढा अजूनही कायम आहे.

मुख्यमंत्र्यांची घेतली होती मुंबईत भेट
मध्यंतरी ठेवीदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. पैसा अडकून पडल्याने उपवर मुलींचे लग्न, पाल्यांचे शिक्षण आणि औषधोपचाराचा खर्च करायचा कसा? असा प्रश्न केला होता. यानंतर ठेवीदारांच्या पदरी काहीतरी पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही कोणत्याही हालचाली नाहीत.

‘सहकार’ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
416 सहकारी संस्था अवसायनात काढण्याबाबत लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल. सूचना करूनही कामात अनियमितता असलेल्या संस्थांविरूद्ध ही कारवाई सुरू आहे.
-आर.आर.शेरे,सहायक निबंधक, भुसावळ तालुका

पतसंस्थांनी कर्ज वसुलीवर भर द्यावा
मी सध्या जळगाव मनपाच्या निवडणुकीत व्यस्त आहे. ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भुसावळ येथे नियमित कामकाजाला सुरूवात होताच ठेवीदारांच्या प्रश्नांकडे लक्ष घालू. ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी पतसंस्थांनी कर्ज वसुलीवर भर द्यावा. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था कितीही मोठी असली तरी कारवाई निश्चित होईल.
-विजयकुमार भांगरे, प्रांताधिकारी, भुसावळ