आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगरात 72 तास पुरेल एवढाच कोळसा; दोन संच बंद पडले तर राज्यात भारनियमन वाढेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- राज्यभरातील महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना सध्या कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. दीपनगर केंद्रात केवळ पाच हजार मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. बुधवारी कोळसा रॅक उपलब्ध झाल्यास केवळ ७२ तास पुरेल इतकाच साठा शिल्लक राहील. तसे झाले तर दाेन्ही संच बंद ठेवावे लागू शकतात. 

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने दिलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात १४ दिवसांचा कोळसा साठा असणे अनिवार्य आहे. मात्र, सध्या टंचाईमुळे साठ्याचे प्रमाण नगण्य आहे. २९ सप्टेंबरला दीपनगर केंद्रात चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक होता. मात्र, यानंतरच्या काळात दसरा, मोहरम, गांधी जयंती आदी सलग सुट्या आल्याने रेल्वेद्वारे कोळसा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या. मंगळवारी दीपनगर केंद्रात केवळ ७२ तास पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक असल्याची माहिती हाती आली अाहे.. बुधवारी दुपारपर्यंत कोळशाचे रेल्वे रॅक उपलब्ध झाल्यास गुरुवारी रात्री कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प होण्याची भीतीही सूत्रांनी व्यक्त केली आहे. दीपनगर केंद्राला दररोज किमान तीन ते चार रॅक कोळसा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या पंधरवड्यापासून दररोज होणारी आवक दोन ते तीन रॅक आहे. 

मागणी २० हजार मेगावॅटवर 
राज्याचीवीज मागणी २० हजार ७४ मेगावॅट असून महानिर्मितीची वीज मागणी १६ हजार मेगावॅटवर आहे. महानिर्मिती, खासगी प्रकल्प सेंट्रल सेक्टरमधून विजेची खरेदी करूनही राज्यात तब्बल दोन हजार मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महानिर्मितीच्या केंद्रांना व्यापक प्रमाणात कोळसा साठा मिळणे अपेक्षित आहे. 

दोन संच कार्यान्वित 
भुसावळच्या दीपनगर औष्णिक केंद्रातील दोन संच सध्या कार्यान्वित आहेत. या केंद्रातून मंगळवारी ६०० मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली. सर्व संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास किमान एक हजारपेक्षा अधिक वीजनिर्मिती केली जाते. 

निर्मिती ठप्प होणार नाही 
दीपनगर औष्णिक केंद्रात तीन दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक आहे. दररोज तीन ते चार रॅक कोळसा उपलब्ध होत आहे. वीजनिर्मिती ठप्प होणार नाही, याची काळजी घेत आहोत. सध्या कोळसा टंचाई आहेच, पण निर्मिती केंद्रच ठप्प होईल, अशी स्थिती नाही. कोळसा मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- आर.आर. बावस्कर, मुख्य अभियंता, दीपनगर 

राज्याची स्थिती बिकट 
महानिर्मितीने२९ सप्टेंबर रोजी दिलेल्या अहवालानुसार चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात आठ, कोराडी केंद्रात नऊ, नाशिक केंद्रात तीन, भुसावळ अर्थात दीपनगर केंद्रात चार, परळी केंद्रात पाच, खापरखेडा केंद्रात १३ तर पारस केंद्रात तीन दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान सलग सुट्या असल्याने हा कोळसा साठा पुन्हा खालावला आहे. 

६०० मेगावॅटची तूट 
सध्यातापमानातील वाढीमुळे शेतीसाठी विजेची मागणी अधिक आहे. यातच आगामी काळात दिवाळी सणानिमित्त राज्यभरातील घरगुती विजेची मागणी वाढणार आहे. दीपनगर केंद्र कोळशाअभावी ठप्प झाल्यास राज्यात ६०० मेगावॅटची तूट वाढून भारनियमन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...