आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळय़ा बाजारात डांबरची विक्री; सहा जणांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेले जात असलेल्या डांबरच्या दोन टँकरसह 25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावर शहरानजीक अतिरिक्त पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई बांद्रा येथून भोपाळच्या दिलीप ट्रान्सपोर्ट कंपनीचे दोन टँकर नागपूरकडे जात होते. हे दोन्ही टँकर शुक्रवारी मुंबई-आग्रा महामार्गालगत शहरानजीक असलेल्या इस्लामी ढाब्याजवळ थांबले होते. या टँकरमधून डांबर काढून ते काळय़ा बाजारात विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आणि त्यांच्या पथकाने शनिवारी पहाटे घटनास्थळी छापा टाकला; मात्र संशयित पसार झाले. या वेळी टँकर (क्र.एमएच-04/ एई-1744) व (क्र.एमपी-09/एचजी-6514)मधून डांबर काढून ते काळय़ा रंगाच्या ड्रममध्ये भरण्यात येत होते. काळय़ा बाजारात विक्रीच्या उद्देशाने हे डांबर काढण्यात येत होते. पोलिसांनी दोन टँकरसह डांबर व पत्र्याचा ड्रम असा 24 लाख 20 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बांद्रा येथून हे डांबर नागपूर येथे घेऊन जाण्याची जबाबदारी असताना चालकांनी ते परस्पर काळय़ा बाजारात विक्री केले. याकामासाठी त्यांना इतर सहा जणांनी सहकार्य केले. आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.आर.पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शफिकखान रफिकखान, चैनसिंग करमसिंग रघुवंशी, रेहानबेग रशीदबेग, आसिफबेग अन्वरबेग, फरहान इम्रान अली (सर्व रा.भोपाळ, मध्य प्रदेश), जीवन जगतराव यादव (रा.भोपाळ, मध्य प्रदेश, ह.मु. धुळे) आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 406, 408, 420, 379, 34प्रमाणे आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या सर्व आरोपींना शनिवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महामार्गावरचे अवैध धंदे

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेले ढाबे आणि हॉटेल परिसरात डांबर, रॉकेल, गॅस उतरवून त्याची काळय़ा बाजारात विक्री करण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा उघडकीस आले आहेत. महामार्गावरील बीएसएनएल टॉवरजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन वेळा कारवाई करून यापूर्वी काळय़ा बाजारात विक्री होणारे डांबर जप्त केले आहे. मात्र त्या प्रकरणांतील मुख्य सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळेच हे प्रकार वारंवार घडत आहेत. या भागातील ढाब्यांवर यापूर्वी काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेले जाणारे रॉकेल व गॅस सिलिंडरदेखील जप्त करण्यात आले आहेत. या धंद्यात अनेक तथाकथित राजकारणी मंडळीदेखील आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर हा महामार्ग अवैध धंद्यांचा मार्ग म्हणून ओळखला जाणार नाही.

राजकीय वरदहस्त..
दरम्यान, काळय़ा बाजारात विक्रीस जात असलेले हे डांबर कुणाचे आहे आणि त्याची विक्री कोठे करण्यात येते? याची माहिती समोर आलेली नाही. तथापि, या प्रकरणातील संशयितांना राजकीय वरदहस्त असल्याचे पोलिसांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. कुणासाठी हे डांबर उतरवले जाते, याची कल्पना पोलिसांना आहे; पण अधिक माहिती तपासाअंती दिली जाईल.