आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात धुके दाटले; हुडहुडी कायम, रुग्णांच्या संख्येत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - ढगाळ वातावरणामुळे तापमान घसरल्याने गेल्या आठ दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच दोन दिवसांपासून पावसाचा शिडकावा होत असल्याने शुक्रवारी सकाळी संपूर्ण शहराने धुक्याची दुलई पांघरली होती. बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांची रुग्णसंख्या वाढली आहे.

यंदा देशात सर्वत्र थंडीची लाट असून, हवामान विभागानेही पावसासह थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राज्यासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. ही स्थिती गुरुवारीही कायम होती. शुक्रवारी दहा मिनिटांचा अपवाद वगळता दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.
वातावरणातील बदलामुळे दोन दिवसांपूर्वी तापमानाचा पारा अंशांपर्यंत घसरला होता; परंतु शुक्रवारी तापमान १५.४ अंशांवर गेले. मात्र, त्यानंतरही गारठा कायम होता. शहरात पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाचा अधूनमधून शिडकावा झाला. त्यामुळे रस्ते ओले झाले होते. अत्यावश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले.
रात्री लवकर झोपते शहर...
विविध भागात एरवी रात्री ११ वाजेपर्यंत नागरिकांची वर्दळ असते; परंतु गत दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने रात्री नऊ वाजताच शुकशुकाट होत आहे. बाजारपेठाही आठ-साठेआठ वाजता बंद होत आहेत. त्याचबरोबर सकाळी १० वाजेपर्यंत तुरळक वर्दळ दिसून येते.
दिवसभर स्वेटरचा वापर
थंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला. बहुतांश विद्यार्थी स्वेटर-टोपी घालूनच शाळेत गेले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी दिवसभर स्वेटर परिधान केल्याने दिसून आले. तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांकडे गरम कपडे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
वातावरणात बदल झाल्याने अंगदुखी, सर्दी-खोकला, ताप येणे, डोके दुखणे आदी तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चार दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. तापमान घसरल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच रात्री नऊ वाजेनंतर कामाशिवाय जास्त वेळ बाहेर थांबू नये, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.