आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपत धुसफूस: कानउघाडणीचे खरे कारण वेगळेच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भाजपच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमांना नगरसेवक हजर राहत नसल्याच्या कारणावरून महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी कानउघाडणी केली. इतक्या किरकोळ कारणावरून एवढा मोठा नेता चार शब्द सुनावेल, अशी शक्यता कमी असल्याचा तर्क आता काढला जात आहे. या वादाचे खरे कारण महापालिकेशी निगडीत वेगवेगळ्या घटना, घडामोडींशी जोडले जात असून मनमर्जी कारभाराला केलेल्या विरोधातूनच हा प्रकार ओढवल्याचे बोलले जात आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी रविवारी भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या वेळी काही बोटावर मोजण्याइतके नगरसेवक गैरहजर होते. खुद्द खडसे बोलणार म्हटल्यावर नगरसेवकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. परंतु बैठकीत मार्गदर्शना ऐवजी कटू शब्दांचा सामना करावा लागला. हे सर्व केवळ व्यापारी गाळ्यांचा तिढा सुटल्यामुळेच घडल्याचा तर्कही आता काढला जात आहे. १५ दिवसांपूर्वी नगरसेवकांनी २०१२ च्या रेडी रेकनरनुसार करार करण्यास विराेध केला. बरेच दिवस वाद सुरू राहिल्यानंतर अखेर नेत्यांची नाराजी ओढवू नये म्हणून प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या. परंतु प्रस्ताव महासभेत आल्याने भाजप नगरसेवकांचा जीव भांड्यात पडला होता. या सर्व घडामोडीत भाजपतील काही नेते जे व्यापाऱ्यांच्या जवळचे मानले जातात, त्यांच्या मनाप्रमाणे घडले नसल्याने नेते नगरसेवकांतील संबंध ताणले गेल्याचेही बोलले जात आहे.
राजकारण आणखी तापणार
भाजपतील काही पदाधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे प्रस्ताव करण्यास नगरसेवकांनी थेट विरोध केल्याने तसेच पुन्हा जेलवारी नको, या ठोस भूमिकेतूनच कालचा प्रसंग ओढवल्याचे विश्लेषण आता भाजपमध्ये केले जात आहे. आगामी काळातही कायद्याच्या चौकटीत राहील तीच भूमिका घेणार, मग पद गेले तरी चालतील, अशी रोखठोक भूमिका घेणार असल्याचेही आता सांगितले जात आहे. केवळ महसूलमंत्री खडसेंच्या माध्यमातून नगरसेवकांची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न आता अनेकांच्या जिव्हारी लागल्याने भाजपांतर्गत वातावरण आणखी खराब हाेण्याची भीती व्यक्त हाेतेय. सत्ता नसताना कामे होत होती. मात्र, आता राज्यात सत्ता, शहराचा आमदार भाजपचा असतानाही अडचणी येत असल्याने राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.