आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात जीर्ण-पडक्या इमारतींच्या मालकांना केवळ नगरपालिकेच्या नोटिसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- सध्या पावसाची रिपरिप सुरु असल्याने शहरातील जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने 12 इमारत मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, संबंधितांना केवळ नोटिसा बजावून पालिकेने जबाबदारी झटकली. त्यामुळे इमारत मालकांनीही नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे.

पावसाळय़ात जीर्ण-पडक्या इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. हा धोका लक्षात घेऊन पालिकेने हालचाली करत मे महिन्यात 10 इमारत मालकांना खबरदारीचे उपाय योजण्याच्या सूचना नोटिसीद्वारे दिल्या होत्या. त्यानंतर दोन इमारत मालकांना पालिकेने जुलैत नोटीस बजावली. नोटिसा बजावल्यानंतर पालिकेने या प्रकरणातून अंग काढून घेतल्याने, इमारत मालकांनीही या प्रकाराच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. शनिमंदिर, विठ्ठलमंदिर, राममंदिर, शिवाजीनगर, जाममोहल्ला, संतोषी माता मंदिर या वॉर्डांसह, मॉडर्न रोड, म्युनिसिपल पार्क या भागातील काही इमारतींसह बालाजी गल्लीतील बमचा वाडा, गांधी चौकातील मांगीलाल बिल्डिंग या इमारती धोकेदायक अवस्थेत आहेत. जवळपास दशकभरापूर्वीच या इमारती जमीनदोस्त होणे आवश्यक होते. धोका लक्षात घेऊन इमारतींमधील रहिवाशांनी इतरत्र स्थलांतर केले आहे. तर काही इमारतींमध्ये अद्यापही व्यावसायिक व भाडेकरूंचा रहिवास सुरू आहे. जीर्णावस्थेत असलेल्या या पडक्या इमारतींवर पावसामुळे गवत आणि झाडेझुडुपे उगवली आहेत. तसेच रिपरिप पावसामुळे इमारतींना पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे काही इमारती अगदी शेवटची घटका मोजत आहेत. बाजारपेठेतील मुख्य मार्गालगत असलेल्या काही इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या इमारतींबाबत लवकरच हालचाली न झाल्याने हानी होण्याची शक्यता आहे.

इमारत मालकांची जबाबदारी
जीर्ण इमारतींबाबत 12 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पडक्या, धोकेदायक इमारतींच्या मालकांना नियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. इमारत कोसळून नुकसान झाल्यास संबंधित मालक जबाबदार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
-व्ही.पी.पाटील, अभियंता, बांधकाम विभाग, नगरपालिका भुसावळ

भिंत पडल्याच्या दोन घटना
पावसाळय़ापूर्वी शिवाजीनगरातील कन्हैय्या चाळमधील इमारतीची भिंत कोसळली होती. तसेच पावसाळय़ात विठ्ठल मंदिर वॉर्डातही जुन्या इमारतीची भिंत पडली होती. या प्रकाराबाबत काही रहिवाशांनी पालिकेकडे अर्ज केले होते. त्यानुसार पालिके ने 12 इमारत मालकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, ही कारवाई येथेच थांबली.

रहिवाशांचा धोका वाढला
काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अशा काळात जीर्ण इमारत कोसळण्याची दाट शक्यता असते. शहरातील बमच्या वाड्यासह मॉडर्न रोड, शिवाजीनगर भागात जीर्ण इमारतींची संख्या अधिक आहे. त्यातील काही इमारती वर्दळीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे एखादी इमारत कोसळल्यास प्रसंगी जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. इमारत मालक मात्र गंभीर नाहीत.