आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टरची गाडी दुचाकीवर धडकली, जखमीला चारचाकीने १५ फूट फरपटत नेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिल्याची घटना आदर्शनगर येथे शनिवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्यासह सुरक्षारक्षकाने जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करता त्यालाच दोषी धरत धमकावले. शंभू नथ्थू सोनवणे (रा. मेहरूण) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी एका अॅपरिक्षाचालकाने माेपेडवरील तरुणीला जाेरदार धडक देऊन ‘हिट अॅण्ड रन’ची घटना घडली. त्यापाठाेपाठ शनिवारी पुन्हा अपघात झाला.

सोनवणे हे जाणता राजा प्रतिष्ठानच्या व्यायामशाळेत प्रशिक्षक आहेत. ते दुचाकीने (एमएच- १९, एजी- ३८८९) आदर्शनगर येथील भगवती पान सेंटर समोरून घरी जात असताना मागून येणाऱ्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे सोनवणे दुचाकीसह सुमारे १५ फूट पुढे फरपटत गेले. हा अपघात पाहून घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. काही जणांनी सोनवणे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. त्यांचा उजवा हात, पाय कमरेला दुखापत झाली आहे.

बदलीचा चालक हाेता
५० फूट पुढे गेलेल्या जिल्हाधिकारी अग्रवाल माघारी फिरून अाल्या. त्यांच्यासह सुरक्षारक्षकाने जखमी सोनवणे यांची साधी विचारपूसही केली नाही. तसेच ‘पाहून गाडी चालवता येत नाही का’? असा उलट सवाल जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी दुचाकीस्वाराला केला. त्यानंतर सुरक्षारक्षकानेही त्यालाच दटावले. त्यानंतर त्या लगेच निघूनही गेल्या. िजल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर शनिवारी नेहमीचा चालक नव्हता, त्यांच्याएेवजी संदीप पाटील हा गाडी चालवत हाेता. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाइलवर वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुरक्षा रक्षकाने मलाच दटावले
जिल्हाधिकाऱ्यांच्यावाहनाने मला मागून धडक दिली. त्यात माझी काहीच चूक नव्हती. अपघातानंतर ते थांबले नाहीत. मात्र, नागरिकांची गर्दी झाल्याने बऱ्याच पुढे गेल्यानंतर नाईलाजास्तव त्यांना घटनास्थळी यावे लागले. घटनास्थळी आल्यावरही उलट सुरक्षारक्षकाने मलाच दटावले. शंभू सोनवणे, जखमी दुचाकी चालक