जळगाव - जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिल्याची घटना येथे शनिवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्यासह सुरक्षा रक्षकाने जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल न करता त्यालाच दोषी धरत धमकावले.
व्यायामशाळेतील प्रशिक्षक शंभू नथ्थू सोनवणे (८३, रा. मेहरूण) सकाळी काम आटोपून ते दुचाकीवर येथील घरी जात असताना मागून येणाऱ्या जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या चारचाकीने गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. सोनवणे दुचाकीसह १५ फूट पुढे घसरत गेले. सोनवणे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा उजवा हात, पाय व कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.
रुग्णालयात नेण्याएेवजी नीट चालण्याचे धडे
माघारी फिरून आलेल्या जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्यासह सुरक्षा रक्षकाने जखमी सोनवणे यांची साधी विचारपूसही केली नाही. उलट ‘पाहून गाडी चालवता येत नाही का,’ असा प्रश्न जिल्हाधिकारी रुबल यांनी उपस्थित करून त्याला दोषी धरले. तर सुरक्षा रक्षकानेही धमकावले. त्यानंतर त्या लगेच निघूनही गेल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी मात्र प्रतिसाद दिला नाही. घटनेबाबत सांगताना सोनवणे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाने मला मागून धडक दिली. माझी काहीच चूक नव्हती. अपघातानंतर ते थांबले नाहीत. मात्र, नागरिकांची गर्दी झाल्याने बऱ्याच पुढे गेल्यानंतर नाइलाजास्तव त्यांना घटनास्थळी यावे लागले त्यांच्या सुरक्षा रक्षकानेही मलाच धमकावले.