आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘इलेक्शन’विनाच कॉलेजमध्ये ‘सिलेक्शन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेसाठी महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधींची निवड शनिवारी अनेक महाविद्यालयांमध्ये झाली. शासनाने या वर्षापासून खुल्या निवडणुका होतील, अशी घोषणा केली होती. मात्र, नवीन विद्यापीठ कायदा अद्याप पारित झाल्यामुळे खुल्या निवडणुकांना बगल देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांचाही हिरमोड झाला.

नवीन कायद्याअभावी चालू वर्षी अनेक प्राधिकरणांच्या निवडणुकांनाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे भविष्यात तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी विद्यापीठाकडून १४ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. शनिवारी जवळपास सर्वच महाविद्यालयांनी विद्यापीठ प्रतिनिधींची निवडप्रक्रिया उरकली. खुल्या निवडणुकांपेक्षा महाविद्यालयांनी निवड केलेल्या प्रतिनिधींची निवड करणे महाविद्यालयांना सोपे गेले. काही विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीत सहभाग घेतला होता. खुल्या निवडणुका नसल्यामुळे त्यात संघटनांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्हच आहे. संघटनांची खुल्या निवडणूक घेण्याची मागणी चांगलीच जोर धरत होती. मात्र, नवीन कायदाच हिवाळी अधिवेशनात पारित होणार असल्यामुळे आता यासंदर्भात काहीच होऊ शकले नाही. यंदा, राज्यशासनाने खोटे आश्वासन दिले, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त होत आहेत. जुन्या पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी निवडीनंतर जल्लोष केला.
पुढच्या वर्षी खुल्या निवडणुका
पुढच्यावर्षी विद्यापीठाचा नवीन कायदा पारित झाल्यास खुल्या निवडणुका घेण्यात येतील. त्यामुळे यंदा जुन्याच पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत. प्रा.सत्यजित साळवे, संचालक,विद्यार्थी कल्याण विभाग, उमवि

खुल्यापद्धतीने निवडणुका व्हायला हव्या होत्या. शासनाने फक्त घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात तसे केले नाही. खुल्या निवडणुकीतून विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांना वाव मिळतो. अॅड.कुणाल पवार, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

सध्याच्या निवडणुका या फक्त निवड आहेत. महाविद्यालय प्रशासनाला योग्य वाटले, त्यांची निवड केली जाते. खुल्या निवडणुकांमध्ये अडचणी सोडवणारे प्रतिनिधी निवडतील. नंदकुमार बिजलगावकर, अभाविप

तीन उमेदवार विजयाचा दावा
दरम्यान,शनिवारी झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडीत युवा सेनेने आपल्या तीन उमेदवारांची निवड झाल्याचा दावा केला आहे. यात मूजे महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी बाहेती महाविद्यालयातील उमेदवार युवा सेनेचे असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात आता पक्ष, विद्यार्थी संघटना दावा करीत असल्या तरी १४ सप्टेंबर रोजी विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष सचिवपदाच्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

युवा नेतृत्वाला मिळणार वाव
१९९४पासून महाविद्यालयांतील खुल्या निवडणूक बंद झाल्या आहेत. तब्बत २१ वर्षांनंतर ही निवडणूक पुन्हा सुरू व्हावी, यासाठी राज्य शासनाने तयारी दाखवली होती. मात्र तसे घडले नाही. खुल्या निवडणुकीतून विद्यार्थी नेतृत्व पुढे आल्यास राज्य, देशपातळीवरील राजकारणातही चांगले नेतृत्व गुण असलेले युवक भेटतील, अशीही अपेक्षा या निवडणुकीतून व्यक्त केली जात होती. मात्र, २०१५ मध्ये बिगुल वाजलेल्या या खुल्या निवडणुकांसाठी अजून एक वर्ष थांबावे लागणार आहे.
मूजे महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधीची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना विद्यार्थी.