आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडंबननाट्य : खान्देशातील ४६ महाविद्यालयांचा सहभाग, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, व्यसनाधीनतेवर प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - अंधश्रद्धा,वाढती भोंदूगिरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, व्यसनाधीनता आदींसह विविध सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांनी विडंबननाट्य सादरीकरणातून जोरदार प्रहार केला. सर्वच स्पर्धकांनी ‘एक से बढकर एक’ सादरीकरण करून विजेतेपदाची शर्यत अधिक चुरशीची केली.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि येथील जी. टी. पाटील महाविद्यालयातर्फे गेल्या तीन दिवसांपासून युवारंग युवक महोत्सव घेण्यात येत आहे. त्यात सोमवारी ग. तु. पाटील रंगमंच क्रमांक एकवर विडंबन नाट्याचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत ४६ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी राजकीय सामाजिक प्रश्नांवर विडंबनातून टिप्पणी केली. धुळ्याच्या झेड. बी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहज आणि सोप्या भाषेतून स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये रूढ झालेली टक्केवारीची पद्धत, त्यामुळे खुंटलेल्या विकासावर प्रकाशझोत टाकला. या नाट्याला उपस्थितांची चांगली दाद मिळाली. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेचे वाढते दुष्परिणाम, चाळीसगाव येथील कोतकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘जवळपास चरणदास’ या नाट्यातून समाजाची मानसिकता, श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या प्रश्नांवर प्रहार केला.

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील उत्तमराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘बाजार’ विडंबनातून विविध क्षेत्रात वाढलेल्या बाजारीकरणावर प्रकाशझोत टाकून उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांचा खून, स्वच्छ भारत अभियान, राजकारण, समाजातील वाढलेली भोंदूगिरी, महिलांची सुरक्षितता, निर्भया प्रकरण, अतिरेकी हल्ले सुरक्षा व्यवस्था यासारख्या संवेदनशील विषयांना स्पर्श केला. स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या सर्वच विडंबन नाट्यांचा उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

विडंबन नाट्य पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याकडे आता सर्वच महाविद्यालयाच्या स्पर्धकांचे लक्ष लागून आहे.

राजकारणावर विडंबननाट्य सादर करताना धुळ्याच्या झेड. बी. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी.
महोत्सवात ‘जवळपास चरणदास’ या विषयावर विडंबन सादर करताना चाळीसगाव येथील कोतकर महाविद्यालयातील विद्यार्थी.

रंगमंचक्रमांक एकवर काल रविवारी समूह लोकनृत्य स्पर्धा झाली. याच रंगमंचावर सोमवारी विडंबननाट्य स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सािहत्य सोबत आणल्याने रंगमंचाच्या सभोवताली चित्रपट सृष्टी अवतरल्याचा भास झाला. महोत्सवामुळे जी. टी. पाटील महाविद्यालयाचे मैदान गर्दीने फुलले आहे.

वन्स मोअरसाठी साकडे
विडंबननाट्यपाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. स्पर्धकांनी सादर केलेल्या विडंबन नाट्याला उपस्थितांनी शिट्या, टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. काही विडंबन नाट्यांना वन्स मोअरची मागणी झाली. मात्र, स्पर्धेचे नियम तसेच निर्धारित कालावधी विचारात घेऊन वन्स मोअरची मागणी पूर्ण होऊ शकली नाही.