आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमधीलही स्वच्छतागृहांचे वाजले बारा; मुलींच्या स्वच्छतागृहाजवळ मुलांचा घोळका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- माध्यमिक शाळांप्रमाणेच शहरातील महाविद्यालयांमध्येही एकाच भिंतीआड मुला-मुलींची स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे मुलांचे घोळके त्या परिसरात असल्याने विद्यार्थिनी स्वच्छतागृहात जाणे टाळतात. परिणामी, त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचे बारा वाजले असल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीतून समोर आली आहे.

नूतन मराठा महाविद्यालयासह सर्वच ठिकाणी अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महाविद्यालयात दुपारच्या वेळी स्वच्छतागृहांची स्वच्छता करून त्यांना कुलूप लावले तर अस्वच्छता कमी होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

मूजे महाविद्यालयात वेगवेगळय़ा इमारतींमध्ये 8 स्वच्छतागृहे आहेत. काही ठिकाणी मुला-मुलींचे स्वच्छतागृह शेजारी-शेजारी असल्यामुळे तेथे नेहमी मुलांचा वावर असतो. तसेच पीजी बिल्डिंगमधील स्वच्छतागृहात अस्वच्छता आहे. येथे विद्यार्थिनींच्या मानाने स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. वर्गांचे नवीन बांधकाम झाले असले तरी, त्या प्रमाणात स्वच्छतागृहे कमी आहेत. महाविद्यालयात 3,101 विद्यार्थिनी आहेत.

बाहेती महाविद्यालयातील स्वच्छतागृहात कुत्र्यांचा मुक्काम
बाहेती महाविद्यालयातही तीन स्वच्छतागृहे शेजारी-शेजारी आहेत. शिवाय स्वच्छतागृहाबाहेर असलेल्या पायर्‍यांवर मुलांचा कट्टा भरतो. त्यामुळे मुली स्वच्छतागृहात जात नाहीत. तसेच ग्राउंड फ्लोअरला असलेल्या स्वच्छतागृहात अस्वच्छता आहे. त्यात कुत्र्यांचाही मुक्काम असतो. येथे सर्वच मजल्यांवर स्वच्छतागृह आहे; मात्र प्रत्येक स्वच्छतागृहाबाहेर मुलांचा घोळका असतोच. महाविद्यालयात 400 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

तक्रार आल्यास कारवाई
महाविद्यालयात ठिकठिकाणी ‘सजेशन बॉक्स’ ठेवण्यात आले आहेत. तसेच स्वतंत्र ‘युवती सभा’ही स्थापन केली आहे. स्वच्छतागृहाबाबत विद्यार्थिनींची तक्रार आली नसून, तक्रार आल्यास कारवाई होईल.
-प्रा.अनिल राव, प्राचार्य, मूजे महाविद्यालय

मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
महाविद्यालय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. आजपर्यंत मुलांनी मुलींना त्रास दिल्याची घटना घडली नसून, तशी तक्रारदेखील आलेली नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.
-प्रा.डॉ.अनिल लोहार, प्राचार्य, बाहेती महाविद्यालय