आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सह्याद्रीच्या कुशीत कळसूबाईच्या पायथ्याशी रानफुलांचा उत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेल्या सह्याद्रीतील डोंगररांगांमध्ये रानफुलांचा उत्सव सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कासच्या पठाराप्रमाणेच नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसूबाई, हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी विविधरंगांच्या फुलांचे ताटवे दिसू लागले आहेत. या पुष्पोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी वाढू लागेल.

मान्सूनच्या आधी या परिसरात काजव्यांचा प्रकाशोत्सव असतो. पावसाळा संपत आला की पुष्पोत्सव सुरू होतो. गणेशोत्सव ते नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अनेक प्रकारची फुले इथे पहायला मिळतात. भंडारदर्‍याकडे जाणारे घाटरस्ते सुरू झाले की, पिवळ्या रंगाची सोनकीची फुले सोबत करतात. मग त्यांच्या जोडीला जांभळ्या, गुलाबी रंगाचा तेरडा येतो. तुडूंब भरलेल्या आर्थर लेकच्या कडेने जाणार्‍या रतनगड, घाटघरच्या रस्त्यावर तर दुतर्फा फुलांचे ताटवे फुलले आहेत. पांढरी, पिवळी, लाल, गुलाबी, निळी, जांभळी, हिरवी अशी रंगांची मुक्त उधळण डोळ्यांचे पारणे फेडते. हे पाहण्यासाठी डोंगरदर्‍यांमध्ये फार पायपीट करण्याचीही गरज नाही. अगदी जाता जाता हे रानवैभव डोळ्यांत साठवता येतं..

सह्यगिरीच्या या डोंगररांगामध्ये पाचशेहून अधिक प्रकारची गवतफुले उमलतात. काही दिवसा, तर काही रात्री फुलतात. काही आकाराने अगदी छोटी, तर काही दुरूनच डोळ्यांत भरणारी. काहींना छानसा वास, तर काही केवळ रंगाने समोरच्याला आकर्षित करणारी. पिवळ्या रंगाची सोनकी तर काही ठिकाणी रानभर एकटीच पसरलेली, जणू काही तिची रितसर लागवडच केलेली. या उलट काही गवतफुले खडकाच्या कपारी लपलेली. ती पाहण्यासाठी अभ्यासू नजरच हवी! यंदा कारवी मात्र फुलली नाही.

भंडारदरा भरला असला, तरी पावसाने अजून निरोप घेतलेला नाही. अधून-मधून सरी कोसळतात. पावसाचे थेंब पाकळ्यांवर झेलत, उराशी साठवत रानफुले अधिकच बहरतात.