आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या टर्ममधील महापौरांवर आगामी निवडणुकीची मदार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खान्देश विकास आघाडीने तीन टर्म निवडून आलेल्या किशोर पाटील यांच्यावर विश्वास दाखवत महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे. भाजपनेही विरोध न करता बिनविरोधचा मार्ग मोकळा केल्याने खाविआसाठी ‘मराठा कार्ड’ फलदायी ठरणार आहे. सहा महिन्यांवर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी महापौरांनी चांगली कामगिरी केल्यास मतदारांवर प्रभाव पडून याचा फायदा सत्ताधार्‍यांना होणार असल्याने शेवटच्या महापौराला पक्षासाठी ‘ब्रँड अँम्बेसेडर’ची भूमिका पार पाडावी लागणार आहे. निवडीसाठी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा होईल. त्यामुळे निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे.

घरकुल प्रकरणामुळे ढवळून निघालेल्या वातावरणामुळे नागरिकांचा सत्ताधार्‍यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. पालिकेवरील कर्जाचा डोंगर उभा असताना आता पालिका भव्यदिव्य कामगिरी करेल, अशी आशा उरलेली नाही. महापालिकेत कामासाठी पैसा नाही, वरिष्ठ अधिकारी नाही म्हणून विभागप्रमुख व कर्मचार्‍यांवरही कुणाचा वचक राहिलेला नाही. किशोर पाटील यांना संधी देताना त्यांचा मंत्रालयातील दांडगा संपर्क, विविध शासकीय योजनांचा निधी खेचून आणण्याची क्षमता, इतर पक्षांतील नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध या गोष्टींचा विचार खान्देश विकास आघाडीतर्फे नक्की झाला असावा. अवघ्या पाच महिन्यांत पाटील यांनी चांगली कामगिरी करून दाखवल्यास, मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्याचा फायदा सत्ताधार्‍यांना होऊ शकतो.


नाव निश्चित, पण गुप्तता
महापालिकेतील अस्थिरतेचे वातावरण पाहता पुढील वर्षी काय स्थिती असेल, याची शाश्वती नसलेल्यांनी संधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे महापौरपदासाठी दोघांव्यतिरिक्त इतरांचीही नावे समोर येत गेली. आमदार सुरेश जैन यांनी मुंबईहून दोन नावांचा पर्याय खान्देश विकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांसमोर ठेवला होता. यातील कोणाला संधी द्यायची याचा निर्णयही आघाडीच्या अध्यक्षांवरच सोपविण्यात आला होता. मात्र, दोन आठवड्यांपासून तापत असलेल्या वातावरणाला योग्य पद्धतीने हाताळत अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत याबाबत गोपनीयता बाळगण्यात स्थानिक नेते यशस्वी झाले.


भाजपने म्यान केली तलवार
महापौरपदासाठी भाजपतर्फे चंद्रकांत कोळी यांनी दोन अर्ज घेतले होते. मात्र, सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही. नगरसचिवांकडे शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता किशोर पाटील यांचे दोन अर्ज भरण्यात आले. एका अर्जावर सूचक म्हणून रमेश जैन तर राजकुमार अडवाणी अनुमोदक आहेत. दुसर्‍या अर्जावर कैलास सोनवणे सूचक तर उपमहापौर अनिल वाणी अनुमोदक आहेत.


खाविआ, राष्ट्रवादीत साटेलोटे
पालिकेच्या महापौर निवडीत सत्ताधारी खाविआ व राष्ट्रवादीत साटेलोटे असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते तर दुसरीकडे त्यांचे नेतेमंडळी किशोर पाटलांसोबत व्यवसायात भागीदार करून भूखंड लाटत असल्याचे म्हटले आहे. सहा महिन्यात महापौर बदलवून हे पद एक बाहुले झाले असून देशात अशी पद्धत कुठेही नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. पालिकेत आयुक्त नसून तीन उपायुक्तांची पदे बर्‍याच महिन्यांपासून रिक्त आहेत याला किशोर पाटील न्याय देतील का, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे.भूखंड व गैरव्यवहारांच्या माध्यमातून येणार्‍या निवडणुकीसाठी मोठा फंड सत्ताधार्‍यांना व राष्ट्रवादीला मिळालेला दिसत असल्याचा आरोप केला आहे.