आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Avinash Gangode, Latest News In Divya Marathi

उपायुक्त गांगोडे म्हणाले, मी तुमचा नव्हे, शासनाचा नोकर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण परिसरातील पाण्याची समस्या घेऊन गेलेल्या भाजप पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून न घेता ‘मी शासनाचा नोकर, तुमचा नाही’ असे वक्तव्य उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी केले. त्यावरून मंगळवारी पालिकेत वातावरण चांगलेच तापले होते. अधिकार्‍यांच्या उद्दामपणाचा निषेध करत नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.
मेहरूण परिसरात मंगळवारी पहाटे पाणीपुरवठा झाला. त्यात गांडूळ व जंतयुक्त पाणी येत असल्याने नगरसेवक अनिल देशमुख यांना नागरिकांनी बोलावून घेतले. हिच परिस्थिती अन्य भागातही असल्याने दुपारी 2 वाजेच्या सुमारास भाजपचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अमित भाटिया, नगरसेविका उज्‍जवला बेंडाळे, जितेंद्र मराठे आदींसह कार्यकर्ते व नागरिकांनी उपायुक्त अविनाश गांगोडे यांची भेट घेतली. यादरम्यान समस्या मांडत असताना अचानक उपायुक्त गांगोडे यांनी एकाने बोला, अन्यथा मी दालनातून निघून जाईल. मी शासनाचा नोकर आहे; तुमचा नाही, असे वक्तव्य के ल्याने कार्यकर्ते संतापले. समस्या मांडणारे लोकप्रतिनिधी असताना उपायुक्तांनी अशा पद्धतीने बोलणे योग्य नसल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच माफी मागावी, अन्यथा आगामी महासभा चालू देणार नसल्याचा इशारा दिला.
उपअभियंत्यावर कारवाईची मागणी

मेहरूण परिसरातील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी किशोर चौधरी हे गेल्या 5 ते 7 वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत आहेत. ते नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. या भागात 30 वर्षांपूर्वी पाइपलाइन टाकली असून ती खराब झालेली असताना दुरुस्ती न करता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यामुळे उपअभियंता चौधरींवर कारवाई करण्याची मागणी केली. पाणी गळतीची कामे हाती घेतली असून बुधवारी या भागातील पाइपलाइनची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आश्वासन अभियंता डी.एस.खडके यांनी दिले.