आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यांसंदर्भात निरीक्षक काईंगडेंची आयुक्तांशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-विविध गुन्ह्यांच्या अभ्यासपूर्ण तपासाचा अनुभव असलेल्या पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला शहर पोलिस ठाण्याचा पदभार आणि त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांशी तासभर केलेली चर्चा ही महापालिकेशी संबंधित इतर गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार असल्याची चिन्हे मानली जात आहेत.
घरकुल घोटाळ्यानंतर पालिकेशी संबंधित विमानतळ आणि वाघूर योजनेतील गैरव्यवहाराबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्या गुन्ह्यांच्या तपासाला मात्र, घरकुलच्या तुलनेत गती येत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षक काईंगडे यांच्याकडे आलेला पदभार लक्षणीय मानला जात आहे. जिल्ह्यातील आणि शहरातीलही विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे पथकांत त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे.
शहर ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे यांची चार दिवसांपूर्वीच पोलिस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी येताच काईंगडे यांनी 28 जानेवारीला आयुक्त संजय कापडणीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पालिकेत गेलो होतो, असे काईंगडे सांगत असले तरी अत्यंत गुप्तता पाळत दीर्घकाळ झालेल्या या चर्चेने संबंधित गुन्ह्यांतील आरोपींना चिंता सतावू लागली आहे.
चवरेंच्या जागी नियुक्ती : शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक चवरे यांच्या कार्यकाळात पोलिस ठाण्यात झालेल्या मलिक-मुलतानी गटाच्या हाणामार्‍या, पोलिस ठाण्याने एलसीबीचे आरोपी आपल्या कोठडीत ठेऊन न घेण्याचे कारण, याशिवाय इतर कारणांमुळे चवरे यांना मुख्यालयात नियुक्ती दिली असून त्यांच्याजागी काईंगडेंना पदभार सोपवला.