आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competitive Exams Lecture In Kanhala Near Bhusawal

लोकवर्गणीतून स्पर्धा परीक्षा अभ्यासिका; कन्हाळे बुद्रूकमधील युवकांचा आदर्श

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- काहीतरी चांगले घडावे, ही प्रत्येकाची मनोमन अपेक्षा असते. मात्र, केवळ अपेक्षेपोटी दिवास्वप्न न पाहता कन्हाळे बुद्रूकमधील युवकांनी वेगळी वाट चोखाळत लोकवर्गणीतून स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका सुरू केली. असा उपक्रम राबवणारे कन्हाळे बुद्रूक (ता.भुसावळ) जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे. ‘लक्ष्य फाउंडेशन’ची भूमिका यामध्ये आधारवडाची ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांच्याहस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. व्याख्यानात त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असली तरी स्पर्धा परीक्षेकडे ते फारसे वळत नाहीत. यश मिळेल का? याबद्दलचा स्वत:मध्ये असलेला न्यूनगंड, योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. या प्रकाराला मुठमाती देत गेल्या सात वर्षांपासून ‘लक्ष्य फाउंडेशन’ने ग्रामीण गुणवत्तेला दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे. मोठय़ा संघर्षातून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेला मोंढाळा येथील नीलेश गायकवाड हा लक्ष्य फाउंडेशनचाच विद्यार्थी. या मुळे हुरूप वाढलेल्या फाउंडेशनने प्रत्येक गावातून एकतरी अधिकारी व्हावा, यासाठी ‘गाव तेथे स्पर्धा परीक्षा केंद्र’ ही संकल्पना हाती घेतली आहे.

यानुषंगाने कन्हाळे बुद्रूकमध्ये फाउंडेशनला गावकर्‍यांची मोलाची साथ मिळाली. भूपेंद्र पाटील, रेवसिंग पाटील या तरुणांनी लोकवर्गणीतून स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीने स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली तर ग्रामस्थांनी अभ्यासिकेत स्वखर्चाने वेगवेगळी पुस्तके भेट दिली. लक्ष्य फाउंडेशनने स्वत: खारीचा वाटा उचलून अभ्यासिकेसाठी पुस्तकांचा संच भेट दिला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोमवारी या अभ्यासिकेचा र्शीगणेशा झाला. यानिमित्त प्रा.लेकुरवाळे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड यांनीही स्पर्धा परीक्षेबाबत अनुभव कथन केले. यानंतर उपस्थितीत प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी घराकडे परतली ती मनामध्ये अधिकारी होण्याची जिद्द घेऊनच!

> स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडथळे निर्माण करणारे भेटतात, दिशाभूल केली जाते. मात्र, गुणवत्ता आणि क्षमता असल्यास कुणीही थांबवू शकत नाही.
> यूपीएससी, एमपीएससी किंवा अन्य स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. नियोजनपूर्वक अभ्यास यश मिळवून देतो.
> टिंग्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाचे संगीतकार रोहित नागभिडे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी शीतल उगलेंच्या जिद्दीचे उदाहरण
> मुलींनी मोठे व्हावे. आम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, असे घरी सांगा. अपयश, त्रास, घृणा पचवून यशप्राप्ती करावी.
> मुलांमध्ये कितीही अवगुण असतील तरी पालकांनी एक तरी गुण शोधून त्यांना प्रोत्साहन द्यावे. बंडखोर मुले हरहुन्नरी असतात.
> काहीतरी वेगळं करण्याची उर्मी होती. दर रविवारी घरी मोफत शिकवणी घ्यायचो. यानंतर दर रविवारी गावात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे सुरू केले.
> मोंढाळा (ता.भुसावळ)पासून सुरुवात केली. व्याख्यानाच्या बदल्यात एक शेर धान्य घेऊन ते वसतिगृहात द्यायचो. मोंढाळ्यात घडेल अधिकार्‍यांची मांदियाळी.
> महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी अधिकारी सुद्धा मार्गदर्शनासाठी यायचे. यानंतर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना आता रिझल्ट हवा, असे सांगितले.
> जिद्दीने पेटून उठलेल्या मुलांनी कितीही अपयश आले तरी ध्यास सोडला नाही. नीलेश गायकवाड पोलिस उपनिरीक्षक झाला. इतरांनी सुद्धा यश मिळवले.
> यशस्वी विद्यार्थी अजून चांगल्या संधीसाठी स्वत:ही अभ्यास करतात. शिवाय कुबड्या दूर सारून इतर विद्यार्थ्यांना घडवण्यास पुढे येत आहेत.

स्वत:मधील क्षमतांचा पूर्ण वापर करा
सागर धनाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वत:मधील क्षमतांचा पुरेपूर वापर करावा. यश मिळेल असे ते म्हणाले. तर पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या नीलेश गायकवाडने स्वत:चे अनुभव कथन केले. कितीही अपयश आले तरी खचू नका. प्रयत्नांअंती यश हमखास असल्याचे तो म्हणाला.

गाव तेथे केंद्राची उभारणी
‘लक्ष्य फाउंडेशन’चे अध्यक्ष संतोष सोनवणे यांनी संस्थेचा हेतू ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळाले पाहिजे. यासाठी ‘गाव तेथे स्पर्धा परीक्षा केंद्र’ ही संकल्पना कृतितून राबवत आहोत. सर्वसामान्य कुटुंबातील नीलेश गायकवाडने मिळवलेल्या यशाने हुरूप वाढल्याचे सांगितले.

यांनी उचलला खारीचा वाटा
कन्हाळे बुद्रूकमध्ये लोकवर्गणीतून सुरू झालेल्या अभ्यासिकेसाठी लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी स्वखर्चातून पुस्तकांचा संच भेट दिला. गावातील भूपेंद्र पाटील 25 पुस्तके, सुनील पाटील, सदाशिव पाटील, डॉ.राजीव पी.सरोदे यांनी प्रत्येकी 10 पुस्तके भेट दिली आहेत.

व्याख्यानाला मान्यवरांची हजेरी
राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, अध्यक्ष संतोष सोनवणे, सुधाकर ठोके, सोमनाथ सोनवणे, सागर धनाळ, ढालसिंग पाटील, कृषी सहायक ए.डी.पाटील, पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेला नीलेश गायकवाड, कन्हाळे खुर्दचे सरपंच सचिन सपकाळे, भूपेंद्र पाटील, रेवसिंग पाटील आदी उपस्थित होते. अभ्यासिकेच्या उद्घाटनानंतर सरस्वती पूजन, दीपप्रज्वलनाने व्याख्यानाची सुरुवात झाली. सुमारे 150 विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती.