आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ दहा शाळांमध्येच संगणक प्रयोगशाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ-विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे ‘आयसीटीसी’ योजना राबवली जात आहे. योजनेनुसार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू केली जाते. 2011-2012 मध्ये योजनेच्या अंमलबजावणीला तालुक्यात सुरुवात झाली. मात्र, त्यानंतरही जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील 71 शाळांपैकी केवळ 10 शाळांमध्येच संगणक प्रयोगशाळा सुरू झाली आहे. इतर शाळांना संगणकच न मिळाल्याने जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान कसे मिळेल? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

खासगी शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज असल्याने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत संगणक प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. या मुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शाळा तेथे संगणक हा उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार 2011-2012 या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील वरणगाव (बॉइज), सुसरी, फुलगाव, पिंप्रीसेकम, साकेगाव (गल्र्स), कन्हाळे बुद्रूक, कुर्‍हे प्र.न. (बॉइज), गोजोरे, वांजोळा, सिद्धेश्वर नगर अशा 10 शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या मुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळत आहेत. संगणक प्रयोगशाळा शिक्षण संचालक (पुणे) यांच्या कार्यालयातर्फे शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू केल्या जातात. मात्र,यानंतरच्या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील एकाही शाळेत संगणक प्रयोगशाळा सुरू झाली नाही. त्यामुळे उर्वरित 61 शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागत आहे.

आमदार निधीतून संगणक
ई - लर्निंग संगणक शाळांसाठी आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस आवश्यक असणार आहे. आमदार निधीतून संगणक दिले जाते. यासाठी शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा असणे गरजेचे आहे.

शाळांना पाच संगणक
शिक्षण संचालक कार्यालयातर्फे तालुक्यातील 10 शाळांमध्ये प्रत्येकी पाच संगणक संच देण्यात आले आहेत. या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळेत वीजपुरवठा आणि इतर सोयीसुविधा असणेही आवश्यक आहे. तालुक्यात मात्र सर्वत्र आलबेल चित्र आहे.

प्रकल्पात सहा शाळा
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्राप्त झालेल्या पत्रानुसार तालुक्यातील सहा शाळांचा ई-लर्निंग संगणक प्रकल्पात समावेश झाला आहे. याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला जाईल. पी.एन.ठाकरे, गटशिक्षणाधिकारी, भुसावळ