आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांअभावी कॉम्प्युटरला निष्क्रियतेचा ‘व्हायरस’!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगणक शिक्षणामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मुलेही मागे राहता कामा नयेत, म्हणून महापालिकेमध्ये सहा वर्षांपासून संगणक शिक्षणाचा खास उपक्रम राबविण्यात आला. महापालिकेच्या अगोदरही नगरपालिकेतर्फे असा उपक्रम हाती घेण्यात आला होता; पण त्यातसुद्धा अनेक वाद निर्माण झाले. त्या काळातील 110 संगणक संच कित्येक वर्षांपासून पोलिस वसाहतीमधील शाळा क्रमांक पाचमधील ‘सील’बंद दोन खोल्यांमध्ये पडून आहेत. आता ते ‘आऊट डेटेड’ झाले आहेत. केंद्रीय संगणक कक्षातील अनेक संच नादुरुस्त आहेत, तर येथील प्रॅक्टिकलमध्येही सातत्य नसल्याचे डी.बी. स्टारच्या पाहणीत आढळले. 9500 पैकी फक्त 3500 विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचा लाभ मिळतोय. संगणक शिक्षकांच्या अभावामुळे ज्या शिक्षकाला जितके जमेल तितके ते कधी तरी विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न करतात. प्राथमिक अवस्थेतच पुरेसे संगणक ज्ञान न मिळाल्यास विद्यार्थ्यांची ही पिढी मोठेपणी महापालिकेच्या शिक्षण यंत्रणेला दोष दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!
शिक्षकच अप्रशिक्षित - महापालिकेच्या एकूण 43 शाळा असून, त्यात 9500 विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुमारे 35 संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शाळा व विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत ही संगणकसंख्या अत्यंत तोकडी ठरत आहे. मध्यंतरी शिक्षकांना 15 दिवसांचे संगणक प्रशिक्षण मिळाले. पंधरा दिवसांत ते काय शिकणार आणि विद्यार्थ्यांना ते काय शिकविणार हा प्रश्न आहे. काही शाळांमध्ये एमएस-सीआयटी उत्तीर्ण शिक्षकांची तात्पुरती मदत होते,. तर काही शाळांमध्ये इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) आलेले शिक्षकच विद्यार्थ्यांना शक्य तितके शिकविण्याचा प्रयत्नही करतात. त्यामुळे तरी काही विद्यार्थी संगणकाद्वारे चित्र काढणे, ते रंगविणे, स्वत:चे नाव टाईप करणे आदी शिकत आहेत.
संगणक ठेवले झाकून - डी. बी. स्टारने प्रारंभी पोलिस वसाहतीमधील शाळा क्र. 5 मध्ये पाहणी केली. मुख्याध्यापकांच्या कक्षात एक संगणक संच आढळला. त्यावर आच्छादन म्हणून कपडा टाकला होता. शिक्षकच नसल्यामुळे संच बंद अवस्थेत असल्यासारखाच आहे. सहावी व सातवीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांना संगणकाबाबत प्राथमिक माहिती विचारली असता त्यांना काहीही सांगता आले नाही. महापालिका केंद्र क्रमांक चारमधील भोईटे प्राथमिक शाळेत पाहणी केली असता येथील संच केंद्रीय संगणक कक्षात तीन महिन्यांपासून महापालिकेचे कर्मचारी घेऊन गेले आहेत. शाळा क्रमांक 48 मध्ये केंद्रीय कक्ष होणार असून, तेथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी सोयीनुसार नेण्यात येईल, असे शिक्षकांनी सांगितले. माध्यमिक विभागाला एप्रिल 2010 मध्ये तत्कालीन आमदार गुरुमुख जगवाणी यांनी 29 हजार 170 रुपये किमतीचे संगणक आमदार निधीतून दिले. संचासाठी व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागादेखील नाही.
प्रिंटर कपाटात खितपत - शिवाजीनगरातील उर्दू शाळा क्रमांक 13 मधील संगणकही केंद्रीय कक्षात जमा आहेत; परंतु प्रिंटर शाळेच्या कपाटातच खितपत पडून आहे. याच इमारतीमधील शाळा क्रमांक 39 मधील संगणकही केंद्रीय कक्षात जमा आहे. गेंदालाल मिल परिसरातील उर्दू शाळा क्रमांक 15 मध्ये दोन संच कापडाखाली झाकलेल्या स्थितीत होते. त्यातील एक संच अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच तो बंद आहे.
केंद्रीय कक्षात 6 संगणक बंद - घाणेकर चौकासमोरील दायमा शाळेतील एक संगणक जूनपासून नजीकच्याच केंद्रीय कक्षात देण्यात आला आहे. या दायमा शाळेतील, तसेच नजीकच्या शाळांतील विद्यार्थ्यांना या केंद्रात सामूहिकरीत्या संगणक शिक्षण दिले जाते. या कक्षात एकूण 10 संगणक आहेत. त्यातील सहा बंद, तर अवघे चार संच सुरू आहेत. चौबे शाळा क्रमांक 33 या हिंदी माध्यमाच्या शाळेतील एक संच डिजिटल रूममध्ये देण्यात आला आहे. याच इमारतीमध्ये शाळा क्र. 27, 01 व केंद्र शाळा क्रमांक दोन अशा एकूण तीन शाळा आहेत.
कुठे आहेत केंद्रीय संगणक कक्ष? - शाळा क्रमांक 10, 17, 38, 48, 56 येथे केंद्रीय संगणक कक्ष स्थापन झाला आहे. या ठिकाणी करारांतर्गत सात संगणक तज्ज्ञ विद्यार्थ्यांना शिकवितात. या शिक्षकांच्या मानधनासाठी 6 लाख 20 हजार रुपये मानधनाची तरतूद आहे. हळूहळू या केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
परत करणार - नुकतेच पाच संगणक प्राप्त झाले आहेत. ज्या शाळांतील संच काढून घेण्यात आले, ते त्यांना त्वरित परत करण्यात येतील. प्रत्येक शाळेत एक तरी संच असावा, म्हणून प्रयत्नशील आहे. अनेक संगणक पडून होते. त्यांचा शोध घेतला. जे नादुरुस्त होते, त्यांना दुरुस्त केले. केंद्रीय कक्षांचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येईल. संगणकाचे किमान प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मिळावे, यासाठी तळमळ आहे. - एस. आर. भडके , प्रशासन अधिकारी, महापालिका
प्रशासन निष्क्रिय - गोरगरिबांच्या मुलांना संगणक शिक्षण मिळणे ही आनंदाचीच बाब आहे; परंतु ही यंत्रणा हाताळणारे प्रशासन मात्र निष्क्रिय आहे. त्यामुळेच शासनाचे ध्येयधोरण व महागडी यंत्रणा अपयशी ठरतेय. स्पर्धा व संगणक युगात महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पीछेहाट होत आहे. स्वतंत्र संगणक शिक्षण समिती स्थापन करावी. तरच या शिक्षणात सुधारणा होईल. - हरीश आटोळे, सदस्य, महापालिका शिक्षण मंडळ
कक्ष सुधारणार - अनेक संगणक धूळ खात पडून अथवा नादुरुस्त होते. ते दुरुस्त करून कामी आणले. ज्या शाळांतील संगणक केंद्रीय कक्षात आणले आहेत, ते लवकरच परत करण्यात येतील. संगणक विभाग अद्ययावत करण्यासाठी महापालिकेची आर्थिक ताकद आडवी येते. तरीही जास्तीत जास्त सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय संगणक कक्ष अधिक विकसित करण्यावर भर आहे. - विजय वाणी, सभापती, महापालिका शिक्षण मंडळ