आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव-वडिलांनी आर्थिक परिस्थिती नसताना शिकवून डॉक्टर केलं. त्यामुळे त्यांचं नाव जन्मभर आपल्या नावाशी जोडलेलं असावं, या मतावर ती ठाम आहे. लग्नानंतरही पतीच्या नावाऐवजी वडिलांचेच नाव लावण्याचा तिचा आग्रह पतीने लगेच स्वीकारला; पण रुढीच्या जोखडात अडलेल्या नोकरशाहीने मात्र तिच्या निर्णयाला विरोध केला आणि कोणताही अधिकार नसताना तो आग्रह ‘बेकायदेशीर’ही ठरवून टाकला.
नंदुरबार येथील शिवराम पवार यांचा मुलगा समीर आणि सून स्नेहल हे लग्नानंतर जळगावला स्थायिक झाले आहेत. दोघेही डॉक्टर असून हे कुटुंब पुरोगामी विचारांचे आहे. डॉ. स्नेहल यांचे माहेर धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरचे. वडील हिरालाल पाटील हे शेतकरी. तीन अपत्त्यांना उच्च शिक्षण देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसतानाही त्यांनी खस्ता खावून आपल्याला डॉक्टर केले. याची जाण त्यांची मोठी कन्या स्नेहल हिला आहे. त्यामुळेच त्यांचे नाव जन्मभर सोबत मिरवायचे हा निश्चय तिने वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच केला होता. लग्न ठरण्यापूर्वी डॉ. समीरला तिने याबाबत स्पष्ट विचारले आणि त्याने त्या विचाराचे स्वागतच केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समीरच्या वडिलांनी, शिवराम पवार यांनी आणि त्यांच्या पत्नीनेही सुनेचा हा विचार उचलून धरला. त्यामुळे लग्नाला चार वर्षे होत आली तरी सर्व कागदपत्रांवर डॉ. स्नेहल यांच्या नावापुढे आजही वडिलांचेच नाव आहे.
तहसीलदारांनी ठरवले बेकायदा : जुलै 2013 मध्ये डॉ. समीर पवार यांनी जळगाव तहसीलदारांकडे शिधापत्रिकेसाठी अर्ज केला. त्याची शहनिशा झाल्यावर चलनही भरले. त्यानुसार 362406 क्रमांकाची शिधापत्रिका तयारही करण्यात आली. त्यावर तहसीलदार कैलास देवरे यांनी 30 सप्टेंबर 2013 रोजी स्वाक्षरीही केली. मात्र, यादीत समीर पवार यांच्यानंतर स्नेहल हिरालाल पाटील यांचा पत्नी म्हणून उल्लेख दिसताच, स्वाक्षरीसह सर्व मजकु रावर रेषा मारत तो रद्द केला. त्या खाली शेरा मारला. पत्नीचे नाते लावल्यानंतर पत्नीच्या नावापुढे पतीचे नाव लावावे लागते. रेशनकार्ड पत्नीच्या वडिलांच्या नावाने बनविण्याचा अर्जदाराचा हट्ट बेकायदेशीर असल्याने रेशनकार्ड रद्द, असे लिहून त्याखाली त्यांनी सही केली. त्यानंतर 362412 क्रमांकाने पुन्हा नवी शिधापत्रिका बनवण्यात आली. ती ही ‘अर्जदाराची मागणी चुकीची आहे, चुकीच्या नावाने रेशनकार्ड बनविल्याने रद्द,’ असा शेरा मारून 8 ऑक्टोबर रोजी तहसीलदारांनी रद्द केली.
नावासाठी सासर्यांचा सत्याग्रह : आपण पती-पत्नी आहोत, असे प्रतिज्ञापत्र द्यायला समीर आणि स्नेहल यांनी संमती दाखवूनही विद्यमान तहसीलदारांनीही अपेक्षित नावाने शिधापत्रिका द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे आपल्या सुनेच्या आग्रहाला पाठिंबा देत शिवराम पवार यांनी तीन दिवसांपासून जळगाव तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह सुरू केला आहे. जोपर्यत अपेक्षित नावाने शिधापत्रिका मिळत नाही तोपर्यंत आपला सत्याग्रह सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी केला आहे. दरम्यान, हे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर असून भविष्यात उद्भवणार्या परिस्थितीला आपणास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, अशी नोटीस तहसीलदारांनी शिवराम पवार यांना 7 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बजावली आहे.
अशी तरतूदच कायद्यात नाही
आपले नाव काय असावे, हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लग्नानंतर कसे नाव लिहावे, असे सांगणारी कोणतीही तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे शिधापत्रिकेवरचे नाव कसे लिहायचे हे अधिकार्यांनी ठरविणे उचित नाही. त्याविरुद्ध संबंधित अर्जदार वरिष्ठांकडे किंवा उच्च् न्यायालयात दाद मागू शकतात. अँड. सुशील अत्रे, जळगाव
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.