आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडीबाबत संभ्रमामुळे पक्ष कार्यालयांमध्ये शांतता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मनपा निवडणुकीसाठी जागावाटप आणि युतीबाबत पक्षस्तरावर निर्णयाला उशिर होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांवर आली आहे; मात्र तरीदेखील पक्षस्तरावर आघाडीबाबतचे चित्र कुठल्याही पक्षातर्फे स्पष्ट झालेले नाही. कॉँग्रेस, शिवसेना आणि खान्देश विकास आघाडी मिळून एकाच छताखाली निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन आहे. त्यासाठी मुंबईत चर्चेसाठी बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपने मात्र सावध पवित्रा घेत अद्याप उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनीही सावध पवित्रा घेतला आहे. तसेच याबाबत वरिष्ठांच्या निर्णयाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. तथापि, कार्यालयांमध्ये मुलाखतीपुरताच उत्साह दिसून आला. त्यानंतर कार्यालयांमधील गर्दी ओसरू लागली आहे. दरम्यान, रविवारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चित होताच प्रचाराच्या हालचाली सुरू होतील, असेही सांगण्यात आले.

काँग्रेसमध्ये आघाडीला विरोध
निवडणूक रिंगणात ताकदीनिशी उतरण्याच्या मानसिकतेत असलेल्या काँग्रेसला यंदा लक्षवेधी कामगिरी करून दाखवायची आहे. यासाठी सक्षम उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या विद्यमान नगरसेवकांसह सक्षम उमेदवारांचा शोध पक्षाकडून घेतला जात आहे. पालिका निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसतर्फे यंदा जोरदार हालचाली सुरू आहेत. पालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवायच्या असल्यास किमान 20 ते 25 जागा मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न केले जात आहेत. खान्देश विकास आघाडीसोबत काँग्रेस लढेल किंवा नाही या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नसला तरी ज्या जागा लढवू त्या जिंकण्यासाठीच अशा दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. कॉग्रेसकडे इच्छुकांची यादी मोठी आहे.