आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षपूर्ती: काँग्रेसकडून मोदी सरकारचा 'कार्यक्रम'; भाजपत सन्नाटा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला मंगळवारी वर्षपूर्ती झाल्याने देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सरकारने वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत कसे ‘अच्छे दिन’ येत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने सरकारवर टीकेची झोड उठवून ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध केला. तसेच माकपनेही मोर्चा काढला.
राज्यभरातही वर्षपूर्तीची धामधूम सुरू असताना शहरातील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मात्र वर्षपूर्तीचा आनंदही दिसला नाही. ३० वर्षांनी बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या पहिल्या वाढदिवसाला कार्यालयात सन्नाटा होता.
देशात भाजपचे सरकार आणि राज्यातील सरकारमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन मंत्री असल्याने जळगावातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आकाश ठेंगणे झाले होते. गेल्या वर्षभरात पक्षपातळीवर घडलेल्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी भाजपचे पदाधिकारी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशे वाजवून आनंद साजरा करीत होते. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला जळगाव भाजपचा उत्साह ओसरल्याचा अनुभव जळगावकरांना मंगळवारी आला. वर्षपूर्तीनिमित्त भाजप कार्यालयासह शहरात कुठेही कोणताही कार्यक्रम घेतला नाही तर साधे पेढेसुद्धा वाटण्यात आले नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. वास्तविक जळगाव शहरात भाजपचे दोन आमदार आहेत. तसेच शहरानेच एक खासदार देखील निवडून दिला आहे.
महापालिकेत देखील भाजप नगरसेवकांची फौज आहे. यातील एकानेसुद्धा वर्षपूर्तीला एकही कार्यक्रम आयोजित करू नये, हे विशेष म्हणावे लागेल. भाजप २५ मे पासून जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबवत आहे. हे कार्यक्रम ३१ मे पर्यत सुरू राहणार आहेत. पण त्यांना मंगळवारी शहरात वर्षपूर्तीचा कार्यक्रम घेण्याचा कसा विसर पडला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वर्षपूर्तीच्या दोन दिवसांनंतर म्हणजे गुरुवारी, २८ मे रोजी शहरात केंद्रीय मंत्री येणार आहेत. त्यानिमित्त कार्यक्रम घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. परंतु वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारतर्फे देशभरात विविध मंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचाच हा एक भाग आहे.
कार्यकर्ते राहिले लांब
भाजपच्या वर्षपूर्ती कार्यक्रमापासून पळ काढण्यासाठी मंगळवारी अनेक कार्यकर्ते कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. काहींनी बाहेरगावी असल्याचे सांगितले. तर काहींनी कार्यक्रमाचे निमंत्रणच नसल्याचे सांगत वेळ मारून नेली. या कार्यकर्त्यांनाही कार्यक्रम आहे की नाही, हे सुद्धा माहित नव्हते. एरवी आठवड्याला मंत्र्यांच्या मागे दिसणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाची आठवण राहिलीच नाही, हे विशेष म्हणावे लागेल. चमकोगिरी करणारे अनेक पदाधिकारी मंगळवारी वाळूचे नदीघाट राखत असल्याचे चित्र होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हटले निवेदनात...
बातम्या आणखी आहेत...