जळगाव- ‘निवडणुकीचे संचालन करणारी यंत्रणाच जर सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत असेल तर निकाल वेगळे कसे लागतील? निवडणूक अायाेग पूर्णपणे शासनाच्या प्रभावामध्ये काम करत अाहे,’ असा अाराेप करत मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत या गाेष्टींचा प्रत्यय अाल्याचे काँग्रेसचे अामदार भाई जगताप यांनी रविवारी सांगितले.
सत्तेत सहभागी असलेली शिवसेनादेखील याबाबत बाेंबा मारून सांगत अाहे. अाम्ही यासंदर्भात न्यायालयात पुरावे सादर करणार अाहाेत, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन त्यांच्या गाडीत पैसे घेऊन फिरत असल्याचाही अाराेप अामदार जगताप यांनी केला.
जळगाव दाैऱ्यावर अालेल्या अामदार भाई जगताप यांनी अजिंठा विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘निवडणूक अायाेग शासनाच्या प्रभावात पूर्णपणे काम करत अाहे. यासंदर्भात मुंबईत मालाड, कुलाबा, पुण्यातील भाेसलेंना जबदरस्तीने भाजपचे चिन्ह देण्याचे प्रकरण हे स्पष्ट पुरावे अाहेत. त्यामुळे काँग्रेस निवडणूक अायाेगाला न्यायालयात खेचणार असल्याचे जगताप म्हणाले.
जिल्हा परिषदेसाठीचे अधिकार स्थानिकांना
जिल्हा परिषदेत सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे अाहेत. काेणासाेबत जायचे यासंदर्भातील सर्व अधिकारी स्थानिक नेत्यांना देण्यात अाले अाहेत. जळगाव जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे चार सदस्य अाणि पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यासंदर्भात निर्णय घेतील. निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी कुणी एकटा जबाबदार नसून ही सामूहिक जबाबदारी असल्याचे अामदार जगताप म्हणाले.