जळगाव - काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी तोडण्याची तयारी चालवली असल्याने स्थानिक पातळीवरही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. विधानसभेसाठी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास अस्तित्वासाठी लढणाऱ्या काँग्रेसच्या तुलनेत सहा अामदार असलेल्या राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.
सद्य:स्थितीत चार मतदारसंघ ताब्यात असलेल्या काँग्रेसकडे सहयाेगी अामदार शिरीष चौधरी वगळता एकही आमदार नाही. राष्ट्रवादीचे मात्र एका सहयोगी सदस्यासह जिल्ह्यात सहा आमदार आहेत. जळगाव शहर, अमळनेर, जामनेर येथे राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. रावेरमध्ये अामदार शिरीष चौधरी यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी केली असल्याने त्यांनी अातापासूनच तशी तयारी ठेवली आहे. राष्ट्रवादीचे सात पैकी सहा मतदारसंघ असुरक्षित आहेत. चाळीसगावमध्ये आमदार राजीव देशमुख यांना विरोधकांशी लढावे लागेल. जळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसचे डी.जी.पाटील हे राष्ट्रवादीची निर्णायक मते पळवू शकतात. पाचोऱ्यातही काट्याची लढत अपेक्षित असल्याने महत्त्वाची मते काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रदीप पवार घेण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरमध्ये ताकत कमी असली तरी काँग्रेसचा उमेदवार एकनाथ खडसेंचा वजिय सुकर करणारा असेल. चोपड्यातील
राखीव मतदार संघासाठी दोन्ही पक्षांकडील सक्षम उमेदवार संधीच्या प्रतीक्षेत आहेत. येथे दोन्ही पक्षांना तेथे फटका बसू शकतो. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्थानिक असल्याने काँग्रेसला चांगली मते तेथे मिळू शकतात. जामनेरमध्ये खासदार ईश्वरलाल जैन यांच्या भूमिकेवर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. भुसावळमध्ये राष्ट्रवादीतच गृहकलह प्रचंड वाढल्याने तेथे काँग्रेसचा उमेदवार फारसा परिणामकारक ठरणार नाही. एरंडोलमध्येही काँग्रेस उमेदवार राष्ट्रवादीला पराभूत करण्याचेच काम करू शकेल. सध्या एकही आमदार नसल्याने काँग्रेसला जिल्ह्यात तसे थेट नुकसान होण्याची भीती नाही, त्या तुलनेत राष्ट्रवादीला मात्र विद्यमान आमदारांच्या जागा वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागणार आहे.