आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीवाटपावरून हमरीतुमरी, सभागृहात ठिय्या देऊन सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - समाननिधीच्या वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभागृहात निषेध आणि घोषणाबाजी करून सभागृहाचे काम बंद पाडले. हे पाहून सत्ताधाऱ्यांच्या उत्तराला उत्तर देत सर्व विषय बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर करून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुंडाळली. तसेच हा विषय एवढ्यावरच थांबता विरोधकांनी सभागृहात ठिय्या मांडून सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीचा निषेध केला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. या वेळी अजेंड्यावरील विषयांवर चर्चा सुरू असताना मंगेश पाटील यांनी मध्येच समान निधीवाटपाचा विषय उपस्थित केला. गेल्या तीन वर्षांत निधीवाटपात विरोधकांना डावलण्यात आले. विशेषत: महिला सदस्यांवर अन्याय केल्याचा ठपका त्यांनी अध्यक्षांवर ठेवला. त्याच्या म्हणण्याला विरोधी गटाच्या इतर सदस्यांनी दुजोरा देत त्यावर आताच खुलासा करा, अशी मागणी लावून धरली. हा विषय अजेंड्यावर नसल्याने त्यावर बोलण्याचा संबंध नाही, असा खुलासा सत्ताधारी सदस्य अध्यक्षांनी केला. मात्र, त्यानंतरही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी निषेध घोषणाबाजी करून सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी काही सदस्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर जाऊन विषय मांडू लागले. हे पाहून सत्ताधारी सदस्यांनी सर्व विषय बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा केली. तसेच अध्यक्षांनी कामकाज संपल्याचे लागलीच जाहीर केले. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडली.
सीईओना घेराव घालण्याचा प्रयत्न
विरोधीगटाच्या सदस्यांनी अध्यक्षा सीईओंना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ होऊन घोषणाबाजी सुरू झाली. काही सदस्यांनी राष्ट्रगीत म्हणा, असे सांगताच विजय पाटील यांनी माइक आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे सदस्यांनी स्वत: राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही सदस्यांचा गोंधळ सुरूच होता. या राजकीय स्टंटबाजीमुळे राष्ट्रगीताचा अवमान झाला.

विरोधक काय म्हणतात?
*तीन वर्षांपासून निधीचे वाटप करताना विरोधकांवर अन्याय केला आहे.
* जनसुविधा, शासनाचा एसआर प्रोग्रॅम मंजूर होऊनही तो सत्ताधाऱ्यांनी दाबून ठेवला आहे.
* भाजप-शिवसेना हे हुकूमशाही पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालवत आहेत.
* यापुढे स्थायी समितीसह जिल्हा परिषदेची कुठलीही सभा होऊ देणार नाही.

सत्ताधारीकाय म्हणतात?
*नवीन सीईओंसमोर छाप पाडण्यासाठी विरोधकांनी हा कट रचला होता.
* विषयपत्रिकेवर समांतर निधीचा विषय नसतानाही उगाच हा विषय उकरून काढला.
* शासकीय निधीचे समान वाटप होते. मात्र, ज्या भागात आवश्यकता नाही त्या भागाला निधी कसा देणार?

आरोप- प्रत्यारोपांचा सामना रंगला
सभेच्यासुरुवातीला इतिवृत्त मंजूर करताना सदस्यांनी गोंधळ घातला. सुरुवातीपासूनच एकमेकांच्या बोलण्यावरून सावळा गोंधळ सुरू होता. ‘आम्हाला बोलू दिले जात नाही’ यावरून महिला आणि पुरुष सदस्य आणि सत्ताधारी विरोधक, असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला होता. या गोंधळामुळे सभेचे बारा वाजले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यासपीठासमोर गोंधळ घालताना विरोधक.

सीईओंकडे मांडली व्यथा
अध्यक्षानिघून गेल्यामुळे सीईओ आस्तिककुमार पांडे यांच्याकडे विरोधकांनी व्यथा मांडली. खरोखर अन्याय झाला असेल तर आपली बाजू अध्यक्षांकडे मांडण्याचा प्रयत्न करेन. मात्र, याबाबतचे सर्व अधिकार अध्यक्षांना असल्याचे सांगून पांडेदेखील निघून गेले.

अध्यक्षांच्या निषेधार्थ ठिय्या
सभासंपल्याचे जाहीर करून अध्यक्षा प्रयाग कोळी निघून गेल्या. त्यामुळे विरोधकांचा राग अनावर झाला. त्यांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन करून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. या वेळी संजय गरुड, विकास पाटील, नगराज पाटील, विजय पाटील, डॉ.उद्धव पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

-जिल्हाभरात सगळ्याच सदस्यांना सर्वच बाबतीत समान निधीचे वितरण होणार नाही. मात्र, विरोधकांना न्याय दिला जाईल. याबाबत दुजाभाव करणार नाही. -प्रयागकोळी, अध्यक्षा,जिल्‍हा परिषद