आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Divya Marathi, Lok Sabha Election, Jalgaon

आढावा बैठकीतही काँग्रेसमधील गोंधळाची परंपरा कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लोकसभा निवडणुकीत सपाटून झालेल्या पराभवाचे चिंतन करण्याऐवजी पक्षातील गटबाजी व पदाधिकार्‍यांविरुद्ध असलेल्या असंतोषाच्या संतापात जिल्हा कॉँग्रेसने आढावा बैठकीतही आपल्या गोंधळाची परंपरा कायम ठेवली. तथापि, पक्षाचा झालेला दारुण पराभव व संघटनात्मक बाबींचा अभाव याचा विचार करून आणि त्यात सुधारणा घडवून येत्या विधानसभेसाठी पक्षाच्या वाट्याला येणार्‍या जळगाव, जामनेर, रावेर व अमळनेर या चार जागा निवडून आणण्याचा दावा पक्षाचे जिल्हा प्रभारी रमेश र्शीखंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

जिल्हाध्यक्षांची एकाकी झुंज
बैठकीसाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यासह बैठकीचे व्यवस्थापन करण्यात जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील यांची तारांबळ उडाली. सुरुवातीपासून माइकचा ताबा घेऊन आपल्या संतप्त भावना मांडण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. बैठकीच्या मध्यंतरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भिला गोटू सोनवणे यांच्या निधनाचे वृत्त धडकताच बैठक तहकूब करण्यात आली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष व प्रभारी यांचे भाषणही होऊ शकले नाही. तथापि, या वेळी भगतसिंग पाटील, योगेंद्रसिंग पाटील, डी.जी.पाटील, डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.बी.एस.पाटील, डॉ.अनिल शिंदे, दिनकर पाटील, टिकमदास तेजवानी यांनी पक्षाने अपयशातून धडा घेत चांगले काम करण्यासाठी गटबाजी दूर करण्याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

स्टेजवर बसण्याचा अधिकार नाही
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करून त्याला सहकार्य करणार्‍यांना व्यासपीठावर बसण्याचा अधिकार नसल्याचे सांगत इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी एनएसयूआयचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांना व्यासपीठावरून जबरीने उठवले. त्यांना र्शीधर चौधरी व अन्य तालुकाध्यक्षांनी साथ दिली. अखेर संदीप पाटील यांनी मध्यस्थी करत मराठे यांना सभागृहाबाहेर नेऊन वाद मिटवला. या वेळी भगतसिंग पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

हिरामण पवार यांचा संताप
पक्ष कार्यकारिणीने तालुक्यासाठी व बंजारा समाजासाठी आजपर्यंत कोणतेही कार्य केले नसल्याचा संताप ज्येष्ठ नागरिक व चाळीसगाव तालुका सरचिटणीस हिरामण पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी पदाधिकार्‍यांना खडे बोल सुनावले.

तालुकाध्यक्ष कामांनुसार बदलणार
माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील यांनी भूतकाळ विसरून आता भविष्याचा वेध घेण्याचे आवाहन केले. तसेच तालुकाध्यक्ष बदलण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मात्र, ज्या तालुकाध्यक्षांनी कामे केली नसतील, त्यांचा अहवाल तपासून कामे करणार्‍यांनाच पदे दिली जातील, असे पक्षाचे प्रभारी रमेश र्शीखंडे यांनी सांगितले. यासह कॉँग्रेस भवनात पार्टी करणार्‍यांची चौकशी करून यापुढे आचारसंहिता तयार करण्याचेही ते म्हणाले.

व्यासपीठावर बसण्यासाठी चढाओढ
बैठकीला तब्बल सव्वा तास उशीर झाला असताना व पुरेशा संख्येसाठी कार्यकर्ते जमवण्याची लगबग सुरू असताना अन्य कार्यकर्त्यांची मात्र व्यासपीठावर बसण्यासाठी चढाओढ सुरू होती. व्यासपीठावर 30 पदाधिकारी, तर बैठकीस आलेल्यांची संख्या 36वर होती. ती हळूहळू वाढत अखेर 60पर्यंत पोहोचली. त्यातही महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्यासह केवळ पाच महिलांची उपस्थिती होती.