आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये एकोप्याचे वारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लोकसभेतील पराभवानंतर सावध पवित्रा घेतलेल्या कॉँग्रेसने विधानसभेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या मशाल रॅलीला शनिवारी जळगावात सुरुवात झाली.
आचारसंहिता घोषित होताच कॉँग्रेसने आयोजित केलेल्या शनिवारच्या बैठकीला पक्षातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, इच्छुक उपस्थित होते. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना कॉँग्रेसमध्ये एकोप्याचे वारे वाहत असल्याचे चित्र शनिवारी कॉँग्रेस भवनात पहायला मिळाले. जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी आणि चारही मतदारसंघातील इच्छुकांच्या उपस्थितीत शनिवारी कॉँग्रेस भवनात बैठक झाली. जिल्हाध्यक्षांनी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या मशाली ब्लॉक अध्यक्षांना सुपूर्द केल्या. निवडणुकीत प्रचारापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावात ही मशाल रॅली काढण्याचा निर्धार करण्यात आला.

प्रत्येक गावात करणार जागृती
मशाल रॅलीच्या माध्यमातून कॉँग्रेसने प्रचाराचा प्रारंभ केला आहे. आघाडीत कॉँग्रेसच्या वाट्याला आलेले मतदारसंघ व इतरही मतदारसंघात मशाल रॅली काढण्याचे प्रदेश कॉँग्रेसकडून आदेश आले आहेत. त्यानुसार मोटारसायकलद्वारे मशाल रॅली काढली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, अमळनेर, रावेर आणि जामनेर या जागा कॉँग्रेसकडे आहेत. त्याठिकाणी उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच प्रत्येक गावात पोहचण्याचे टार्गेट तालुका पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी अध्यक्ष उदय पाटील, अॅड.सलीम पटेल, डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, योगेंद्रसिंग पाटील, अविनाश भालेराव, नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, डी.के.पाटील, डॉ.सुरेश पाटील, बी.बी.पाटील, राजस कोतवाल, विरेंद्रसिंग पाटील, भगतसिंग पाटील, सुवर्णा मोरे, श्याम तायडे, विवेक ठाकरे, परवेज पठाण, अरुण चांगरे, संजय वराडे, मोहन निकम, प्रभाकर सोनावणे.

महानगरपालिका बरखास्त करण्याचा ठराव
महानगरपालिकेत एकही नगरसेवक निवडून न अालेल्या काँग्रेसने शनिवारी झालेल्या जिल्हा बैठकीत जळगाव महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी केली आणि ठरावही केला आहे. पालिकेची खाती गोठवण्यात आली आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, अशा स्थितीत नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने पालिका बरखास्त करण्यात यावी. येत्या चार दिवसांत प्रत्येक गावात मशाल रॅली काढून काँग्रेसच्या याेजना, निर्णयाचा प्रसार करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी आदी ठराव काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आले.

दुहेरी संघर्ष
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केलेली आहे. स्वबळावर लढलो तर विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भर पडणार आहे. आघाडी झाली तरी देखील काही ठिकाणी राष्ट्रवादीचे इच्छुक अपक्ष निवडणूक लढवतील तर काही विराेधात काम करतील , अशी शक्यता गृहीत धरून कामाला लागले पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला.