आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वचनपूर्ती मेळाव्यास हजार कार्यकर्ते नेण्याचा मानस काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रविवारी नाशिक येथे होणार्‍या कॉँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यास जिल्हाभरातून एक हजार पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन जाण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या शहर व जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला जिल्हय़ात सहा जागांची मागणी करण्यात येऊन याबाबत तडजोड न झाल्यास सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारीही दर्शवण्यात आली. कॉँग्रेस भवनात प्रथमच ही बैठक गोंधळाविना झाली.

नाशिकला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसह पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. या मेळाव्यास कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा प्रभारी रमेश र्शीखंडे म्हणाले की, केलेली कामे जनतेसमोर मांडण्यात पक्ष कमी पडला व त्याचा लाभ विरोधी पक्षांनी घेतला. तसेच ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवले गेले; परंतु यापुढे ‘मोदी लाट’ कुठेही चालणार नाही. राज्यात सर्व जागा स्वबळावर लढण्याची पक्षाची तयार असून, तसे न झाल्यास किमान 144 जागा लढवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

जिल्हाध्यक्ष अँड.संदीप पाटील यांनी पक्षाची ताकद पुन्हा दाखवून देण्याची वेळ आल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी संयमाने काम करण्याची गरज व्यक्त केली. माजी खासदार विजय पाटील, तालुकाध्यक्ष शरद महाजन, प्रा.उल्हास पवार, वैद्यकीय सेलचे डॉ.राधेश्याम चौधरी, भगतसिंग पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, मोहन निकम यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर योगेंद्रसिंग पाटील, डॉ.ए.जी.भंगाळे, वासुदेव महाजन आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
प्रथमच गोंधळाविना झाली बैठक
कॉँग्रेस भवनात प्रथमच ही जिल्हास्तरीय बैठक शांततेत पार पडली. मात्र, व्यासपीठाची जागा बदलल्याने व्यासपीठावरील कार्यकर्त्यांची गर्दीही कमी झालेली दिसली. बैठकीत सतत पुरवले जाणारे पाणी व चहामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून शांतताही कायम राहिली. पहिल्यांदाच एखादी बैठक गोंधळाविना पार पडल्याने जिल्हा पदाधिकार्‍यांनाही दिलासा मिळाला.