आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांची हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - आघाडी तुटल्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यभरात एकमेकांविरोधात स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. असे असताना जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डिगंबर पाटील यांच्या मेळाव्यास शुक्रवारी कॉंग्रेसचे नेते हजर होते. वास्तविक या मतदारसंघात कॉँग्रेसने आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे मेळाव्यातील नेत्यांची उपस्थिती अनेकांना खटकत होती.

नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर डिगंबर पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. शुक्रवारी त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील भवानी फाट्यावर मेळावा झाला. या वेळी कॉंग्रेसच्या संनियंत्रण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा तालुक्यातील नेते प्रमोद पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मेळाव्यास जामनेर पालिकेचे नगराध्यक्ष पारस ललवाणी, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक जावेद इकबाल अब्दुल रशीद यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, संघटनेतील पदाधिकाऱ्यांना फरक पडत नसला तरी, पक्षाच्या चिन्हावर निवडून गेलेले असल्याने सदस्यत्व रद्द होण्याच्या भीतीपोटी नगराध्यक्ष ललवाणी व जावेद इकबाल हे राष्ट्रवादीच्या मंचावर जाऊ शकले नाहीत.

कॉंग्रेसच्या बैठकीकडे लक्ष...
कॉँग्रेसने जामनेरातून ज्योत्स्ना विसपुते यांना उमेदवारी दिल्यानंतर चुकीचा उमेदवार दिला म्हणून तालुकाध्यक्ष अजय पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ओरड केली होती. त्यामुळे कॉँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले असून, ते कोणत्याही कार्यात सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे रविवारी सकाळी १० वाजता भगीरथीबाई मंगल कार्यालयात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यात नाराज उमेदवाराला साथ द्यायची की नाही? याबाबत निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.