धुळे- पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरण्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याने शासनाने तातडीने धुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार कुणाल पाटील, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, तालुकाध्यक्ष भगवान पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, दूध संघाचे चेअरमन वसंत पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, राजू तावडे, प्रभा परदेशी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पहिल्याच पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्यांना सामोरे जावे लागले.
जुलै महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. पिकांना पाणी नसल्याने ती करपली असून, बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी हाल हाेत आहेत. काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून धुळे तालुक्यातील सर्व महसूल मंडळात तातडीने पिकांचे पंचनामे करण्यात यावे, दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचे पथक बोलावण्यात यावे, तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतसारा, वीजबिल, पीककर्ज माफ करण्यात यावे, चारा छावण्या सुरू करण्यात याव्या, टंचाई आराखड्याला मुदतवाढ देण्यात यावी, टंचाई असलेल्या गावात तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी झाली.