आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणधारकांना अभय देत ठेकेदाराकडून गटारीचे बांधकाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेल्वेस्थानकडे जिल्हा परिषद रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा विषय प्रलंबित आहे. दरम्यान, या रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी अतिक्रमणधारकांना संरक्षण देत गटारीचे बांधकाम बिनधास्तपणे सुरू आहे. मिळालेले काम पूर्ण करून देण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करत पालिकेची परवानगी घेता मक्तेदाराकडून काम उरकवले जात असल्याची ओरड होत आहेत.
रेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद रस्त्याच्या अर्ध्या भागाचे नुकतेच रुंदीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावरील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पूर्वी अस्तित्वास असलेल्या गटारीचे रस्त्याच्या कडेला बांधकाम करणे अपेक्षित होते. यासाठी हॉटेल बॉम्बेलगत नवीन आरसीसी गटार बांधकामाचा मक्ता दिला गेला होता. पालिकेतर्फे गटार बांधकामासाठी आखणी करून दिलेल्या जागेत ओट्यांचे काही दुकानांचे अतिक्रमण आहे. गटार बांधकाम करण्यापूर्वी ही अतिक्रमणे काढून मिळण्यासंदर्भात बांधकाम विभागातर्फे नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, हाती घेतलेले काम उरकवण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करत आणि प्रशासनाची पूर्व परवानगी घेता मक्तेदाराने आहे त्या स्थितीत गटार बांधकाम सुरू केले आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यास कायमस्वरूपी अतिक्रमणधारकांना अभय दिले जाणार असल्याची ओरड होत आहे.
अतिक्रमणाशी संबंध नाही
गटारीचे काम करताना अतिक्रमणधारकांना संरक्षण देण्याशी संबंध नाही. काम थांबू नये म्हणून सामंजस्याने घेत मार्ग काढला आहे. काहींनी स्वार्थापोटी तक्रार केली असावी.
अमोल कोल्हे, मक्तेदार
कार्यभार नुकताच घेतला
माझ्याकडेमहिनाभरापूर्वीच या भागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मूळ काम पाहून याकडे लक्ष द्यावे लागते. गटारीचे बांधकाम करताना पालिकेने ठरवून दिलेली लाइन चेंज करता येत नाही. प्रत्यक्षात या ठिकाणी काय सुरू आहे, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
भागवत पाटील, कनिष्ठ अभियंता
अतिक्रमणबाबत पत्र दिले
रेल्वेस्थानकते जिल्हा परिषद रस्त्यावरील हॉटेल बॉम्बेलगत नवीन गटार करण्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासंदर्भात नगररचना आणि अतिक्रमण विभागाला पत्र दिले होते. मात्र, या विभागांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कामाला विलंब होत असल्याने मक्तेदाराने आहे त्या स्थितीत कामाला सुरुवात केली आहे.
चंद्रकांत सोनगिरे, कनिष्ठ अभियंता
बातम्या आणखी आहेत...