आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीला येणे जमत नसेल तर आयुक्तांनी राजीनामा द्यावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पर्यावरणाच्याप्रश्नाकडे सर्वत्र गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. महापालिकेतही वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली आहे; परंतु या समितीच्या प्रत्येक बैठकीला आयुक्त डॉ. नामदेव भोसले अनुपस्थित असतात. बैठकीला उपस्थित राहणे जमत नसेल तर आयुक्त भोसले यांनी वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत झाली.
महापालिकेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, अभियंता कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठक सुरू होताच समितीचे सदस्य मनोज मोरे यांनी आयुक्त डॉ. नामदेव भोसले सभेला का आले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. पर्यावरणाचा विषय महत्त्वाचा असताना आयुक्त भोसले हे वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष असताना ते समितीच्या बैठकीला येत नाहीत. दुसरीकडे ते शहरात वृक्षारोपणाचे उपक्रम राबवून पर्यावरणाची काळजी असल्याचे दाखवतात. पण वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीला येत नाहीत. त्यांच्याकडे जर बैठकीला येण्यासाठी वेळ नसेल तर त्यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. अध्यक्षपदी कायमस्वरूपी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम म्हणाले की, आयुक्त महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले असल्याने त्यांना बैठकीला येता आले नाही, असा खुलासा त्यांनी केला. त्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत पुढील बैठकीला आयुक्त उपस्थित राहिले नाही तर बैठक तहकूब करण्यात येईल असा निर्णय घेतला. दरम्यान, येथील गरुड हायस्कूल संकुलातील वृक्षाची छाटणी करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधितांना नोटीस देण्यात आली होती.

वृक्ष लावले तरच मिळेल अनामत
बैठकीत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. त्यात वृक्ष तोडण्यासाठी पूर्वी २५ हजार रुपये अनामत रक्कम घेण्याऐवजी ती पाच हजार रुपये घ्यावी. झाड तोडल्यावर त्याऐवजी नवीन पाच झाडे लावून त्यांचे संगोपन केल्याचे सिद्ध केल्यानंतर संबंधिताला अनामत रक्कम परत द्यावी. सार्वजनिक भागातील झाडे तोडल्यावर त्याबदल्यात नवीन झाडे लावण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी, अशी सूचना या वेळी माबूद पेंटर यांनी केली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

किती वृक्ष लावले ते प्रशासनाने सांगावे
इस्माईल पठाण म्हणाले की, आतापर्यंत वृक्ष तोडण्यासाठी अनेकांना मंजुरी देण्यात आली आहे. त्या बदल्यात किती जणांनी वृक्षांचे रोपण केले याची माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. ती पुढील सभेत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरात हजार २०० सागाची झाडे विनापरवानगी तोडण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई झाली याची विचारणा बैठकीत करण्यात आली. त्यावर सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांनी या विषयी संबंधितांना नोटीस देण्यात येऊन पोलिसांत अर्ज दिल्याचे स्पष्ट केले.

सभेत ‘दिव्य मराठी’चे वृत्त
झेड.बी.पाटीलमहाविद्यालयाच्या संरक्षण भिंतीजवळ धोकेदायक निंबाचे झाड होते. ते तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. या धोकेदायक वृक्षाला पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झाड तोडले. वृक्ष तोडण्यासाठी परवानगी दिली होती का असा प्रश्न उपस्थित करत या विषयाची ‘दिव्य मराठी’मुळे माहिती मिळाल्याचे मनोज मोरे यांनी सांगत ‘दिव्य मराठी’चा अंक सभागृहात झळकवला.