आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cooperation Department,Latest News In Divya Marathi

ठेवीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न; वाद टाळण्यासाठी सहकार विभागाने उचलले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्य शासनाने ठेवीदारांच्या उपवर मुलींसाठी मंजूर केलेल्या पाच कोटींच्या आर्थिक पॅकेजचे वितरण करताना सहकार खात्याने ठेवीदार संघटनांची मध्यस्थी टाळण्यासाठी थेट ठेवीदारांना घरपोच धनादेश वितरित केले आहेत. पॅकेजसाठी माहिती पाठवण्यापासून तर लाभार्थ्यांच्या निवडीपर्यंत प्रक्रियेत ठेवीदार संघटनांमुळे वाद निर्माण झाला होता. तसेच ठेवीदारांकडून संघटनांबाबत तक्रारी वाढल्याने सहकार विभागातर्फे शक्य तेवढय़ा ठेवीदारांना घरपोच धनादेश वितरित करण्यात आले.

ठेवीदार संघटनेमार्फत आलेले प्रस्तावच मंजूर करावे, म्हणून हट्ट करणार्‍या संघटनेचे लाभार्थी बोगस असल्याचा दावा दुसर्‍या एका संघटनेने केला होता. त्यामुळे दोन्ही संघटनांतील वाद विकोपाला गेले होते. संघटनेने घेतलेल्या आंदोलनाच्या पावित्र्यामुळे प्रशासनाने नमते घेत चौकशीचे सर्व सोपस्कार पूर्ण करून लाभार्थ्यांची निवडदेखील केली होती. त्यानंतर मात्र सहकार खात्याने थेट ठेवीदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.
सहकार विभागाने घेतली खबरदारी
यापूर्वी जिल्ह्याला मिळालेल्या दोनशे कोटींच्या पॅकेजचे वितरण करण्यावरून ठेवीदार संघटनांमध्ये वाद उफाळले होते. आमच्या संघटनेकडून आलेली नावे मंजूर करावी, त्यांच्या निधीचे वितरण आमच्याकडे सोपवण्यात यावे, या मागण्यांसाठी काही संघटना त्या वेळी अडून बसल्या होत्या. तर काही पदाधिकार्‍यांनी धनादेश देण्यासाठी ठेवीदारांकडे पैशांची मागणीदेखील केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अनेक ठेवीदारांना मदतीपासून वंचित राहावे लागले होते. या पार्श्वभूमीवर या वेळच्या पॅकेजबाबत सहकार विभागाने खबरदारी घेतली आहे.
संघटनांशिवाय थेट ठेवीदारांना करण्यात आले पॅकेजचे वितरण
पॅकेजचे पैसे आल्याची चर्चा सुरू होण्यापूर्वीच सहकार खात्याने उपवर मुलींच्या नावे आलेले धनादेश पतसंस्था आणि सहकार विभागाकडून थेट ठेवीदारांना देण्याचा निर्णय घेतला. काही ठेवीदारांनी पतसंस्थेत जाऊन धनादेश घेतले. थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रशासनाविषयी ठेवीदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सहकार खात्याने यानिमित्ताने केला आहे. थेट घरपोच मदत दिल्यामुळे यापुढच्या काळात ठेवीदारांकडून चांगले सहकार्य मिळण्याची अपेक्षा सहकार विभागाने व्यक्त केली आहे. सहकार विभागाच्या घरपोच धनादेश वितरणाच्या निर्णयाने खर्‍या लाभार्थ्यांना उपयोग होणार आहे. संघटनांमधील वाद थांबतील. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाला आळा बसण्यास मदत होईल.