आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेत हुकलेले लक्ष्मीदर्शन पालिकेत घडणार ; 10 ते 15 लाखांची बिदागी शक्य, शहरात चर्चेला ऊत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्याने हिरमुसलेल्या नगरसेवकांना आता नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीत नव्याने ‘लक्ष्मीदर्शना’चे योग जुळून आलेले आहेत. उमेदवारांची नावे समोर येण्यापूर्वी सरासरी 10 ते 15 लाखांचा रेट फुटला आहे.

नगराध्यक्षपदासाठी इर्षेला पेटलेल्यांकडून या बिदागीमध्ये अजून वाढ होणे शक्य आहे.जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाची नगरपालिका म्हणून भुसावळचे नाव परिचित आहे. दीड दशकांपासून अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या या पालिकेच्या तिजोरीत विकासकामांसाठी ठणठणाट आहे. अपूर्ण आणि प्रलंबित कामे पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या मोठे दिव्य असले तरी भुसावळच्या नगराध्यक्ष पदाचा काटेरी मुकूट मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा आपापल्या सोयीनुसार वापर केला जातो. अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांनी ही आयुधे पाजाळून ठेवली होती. मात्र, सरकारने विद्यमान नगराध्यक्षांनाच सहा महिने मुदतवाढीचा पवित्रा घेतल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मात्र, आता सरकारने माघार घेत ठरल्यानुसार उर्वरित अडीच वर्षांसाठी नवीन पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा करताच ‘थैल्या सैल’ सोडणे सुरू झाले आहे.
एकीकडे पावसाअभावी सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागलेला असला तरी काही नगरसेवकांना मात्र ‘चंगळी’ची स्वप्ने पडत आहेत. देवदर्शनासह मनसोक्त खरेदी आणि पुन्हा 10 ते 15 लाखांची खुशाली, अशी साधारण बोलणी सुरू आहे. उमेदवार पाहून हा आकडा वाढू शकतो.

राष्ट्रवादीतील भांडणे पथ्यावर
47 नगरसेवकांच्या भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत आहे. सत्ता स्थापनेपासून अपक्ष सुद्धा राष्ट्रवादीसोबत आहेत. मात्र, पालकमंत्री संजय सावकारे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यामध्ये बिनसल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. माजी आमदार चौधरींच्या गटाला पालिकेतील सत्ता टिकवून ठेवणे राजकीय भवितव्यासाठी अपरिहार्य आहे तर विधानसभेच्या दृष्टीने पालिकेवर ‘आपला माणूस’ बसवणे पालकमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. या भांडणात विरोधकांचा भाव मात्र वाढला आहे. या माध्यमातूनच कोटींच्या कोटी उड्डाणे शक्य आहे.

चौधरींसाठी पालिका अपरिहार्य
राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे भावी नगराध्यक्ष कोण? हे ठरवण्यात भाजपचे 11 आणि खान्देश विकास आघाडीचे 8 नगरसेवक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या गटाने राष्ट्रवादीतील पालकमंत्री गटाला साथ दिल्यास सामना बरोबरीत येईल. मात्र, पारडे कोणाकडे झुकेल? याचा निर्णय काठावरील नगरसेवकांना लक्ष्मीदर्शन कोण आणि किती घडवतो? यावर अवलंबून असेल. पालकमंत्र्यांना नामोहरम करण्यासाठी इर्षेला पेटलेले संतोष चौधरी ‘मी म्हणेल तेच’ हे सिद्ध करण्यासाठी धक्कातंत्र वापरू शकतात.