आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी शिक्षकांच्या खुलेअाम काॅप्या, डीएड परीक्षा हॉलमधील खिडक्यांत काॅप्याच काॅप्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- परीक्षेत कॉपी करण्याची जणू पद्धतच आता रूढ होत चालली आहे. शिक्षकी पेशाचे शिक्षण घेणारे विद्यार्थीदेखील त्याला अपवाद राहिलेले नाहीत. शहरातील भगीरथ स्कूलमध्ये सुरू असलेल्या डीएड परीक्षेत हा प्रकार समोर आला आहे. सहा दिवसांपासून सुरू झालेल्या या परीक्षेत संपूर्ण शाळेत कॉप्यांचा खच पडला आहे. ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले आहे.

जूनपासून या शाळेत डीएडची परीक्षा सुरू आहे. ११ वर्गांमध्ये सुमारे २५८ विद्यार्थी शिक्षक दररोज दोन सत्रात परीक्षा देत असून, ११ जूनपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार अाहे. दरम्यान, या परीक्षेत विद्यार्थी कॉपी करत असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी परीक्षा केंद्रावर जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते थेट वर्गांच्या बाहेरपर्यंत गाइडची पाने कॉप्यांचे कागद पडलेले होते. वर्गखोल्यांच्या खिडक्यांखाली मोठ्या प्रमाणात कागद पडलेले होते. डीएडशी संबंधित अभ्यासक्रमांची पुस्तके गाइडची फाडलेली पाने होती. तसेच शाळेच्या मुख्य इमारतीखाली तीन ते चार युवक बसलेले होते. हे युवक परीक्षार्थी किंवा शाळेचे कर्मचारी नव्हते. मात्र, तरीही ते शाळेत वावरत होते काही शिक्षकांशी इशाऱ्याने बाेलत होते. त्यांच्या हातातही काही पुस्तके कागद होते. ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी शाळेत शिरल्यानंतर त्यांनी जवळ येऊन विचारपूस केली. या वेळी छायाचित्रकाराच्या हातातील कॅमेरा पाहून सर्व युवकांनी तत्काळ काढता पाय घेतला. त्यानंतर ते परत आलेच नाहीत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका झाडामागे लपून ते सर्व परिस्थिती न्याहाळत होते. बहुधा हे युवकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत होते. कारण त्यांच्या हातात कॉपीसदृश कागद होते. मात्र, त्यांना शाळेच्या परिसरात प्रवेश कोणी दिला? ते कोणत्या शिक्षकांशी इशाऱ्याने बोलत होते? याबाबत केंद्र संचालकांनीही माहिती दिली नाही.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे?
शाळेचापरिसर वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मात्र, डीएडची परीक्षा सुरू झाल्यापासून तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे परीक्षेवेळी सुरू असलेला गैरप्रकार समोर येत नाही. हे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक कारणामुळे बंद आहेत की स्वत:हून बंद केले आहेत? याचे कारणही गुलदस्त्यात आहे. मात्र, ही परिस्थिती संशय निर्माण करणारी आहे.

मुलेकॉप्या आणतात :
परीक्षेसाठीमुले कॉप्या आणत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, आम्ही कसून चौकशी करत आहोत. तसेच कॉपी आढळून आल्यास ती जप्त करून संबंधित विद्यार्थ्यांना समज देण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यासंदर्भात मात्र माहिती नसल्याचे केंद्र संचालक बळीराम धाडी म्हणाले.

दोनवेळा जप्त केल्या कॉप्या : परीक्षासुरू झाल्यापासून आमच्या पथकाने दोन वेळा केंद्राला भेटी दिल्या. दोन्ही वेळा विद्यार्थ्यांची झडती घेण्यात आली होती. त्या वेळी अनेक मुलांकडे कॉप्या आढळून आल्या होत्या. कॉप्या जप्त करून संबंधित विद्यार्थ्यांना तंबी देण्यात आली आहे. ठोस कारवाई मात्र केली नसल्याचे डाएटचे प्राचार्य अनिल झोपे म्हणाले.
पाच-सहा विद्यार्थ्यांना समज
पेपरलिहीत असताना सोबत कॉप्या बाळगल्याप्रकरणी गुरुवारी पाच ते सहा विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. तसेच त्यांच्याकडील कॉप्या शिक्षकांनी जप्त करून कचरापेटीत टाकल्या होत्या. असे असले तरी वर्गखोल्यांच्या खिडक्यांतून अधूनमधून कागदाचे बोळे बाहेर फेकले जात होते. ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी पोहाेचल्यानंतर काही वर्गांमध्ये सुरू असलेली कुजबुजदेखील अचानक बंद झाली.
बातम्या आणखी आहेत...