आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉप्या पुरवणाऱ्या टवाळखोरांनी एकाचे दगड मारून फोडले डोके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कॉप्या पुरवणाऱ्या टवाळखोरांना हटकल्याने त्यांनी रागाच्या भरात स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे दगड मारून डोके फोडले. शिवतीर्थ मैदान येथे शनिवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. शिवतीर्थ मैदानावरील शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे.
 
तसेच सध्या दहावी, बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे ला.ना. शाळा, विद्यानिकेतन शाळा, नूतन मराठा महाविद्यालय येथे परीक्षेला बसलेल्या कॉपीबहाद्दरांना कॉप्या पुरवण्यासाठी टवाळखोर शिवतीर्थ मैदानावर एकत्र येत आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे आडोशाला सावलीत बसून कॉप्या तयार करण्याचे काम दहावी, बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून होत आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी या टवाळखोरांना येथून हटकले होते. तसेच येथे गर्दी होऊ देऊ नका, असा दम स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनाही भरला होता. त्यानुसार शनिवारी कार्यकर्त्यांनी कॉप्या पुरवण्यासाठी जमलेल्या टवाळखोरांना तेथून निघून जाण्यास सांगितले. यामुळे कार्यकर्ते टवाळखोरांमध्ये बाचाबाची शिवीगाळ झाली.
 
 काही वेळेतच टवाळखोरांनी ३०-३५ गुंड प्रवृत्तीची मुले तेथे बोलावली. त्यानंतर सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांना घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. यात ललित सोनवणे या कार्यकर्त्याच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे त्याचे डोके फुटले. या मारहाणीमुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची गर्दी शिवतीर्थ मैदानाकडे जमली होती.
 
काही नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्नही केला. काही जणांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहाेचले होते. मात्र, ताेपर्यंत टवाळखोरांनी पळ काढला होता. स्वराज्य निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी टवाळखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना कोणीही मिळून आले नाही. 
 
टवाळखोर पोलिसांनाही डोईजड 
दहावीची परीक्षा मार्चपासून सुरू झाली आहे. तेव्हापासून अनेक परीक्षा केंद्रांमध्ये कॉप्या पुरवण्यासाठी टवाळखोरांच्या झुंडी जमलेल्या असतात. पहिल्याच दिवशी या टवाळखाेरांनी पाेलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली होती. पोलिस कर्मचारी शाळेच्या इमारतीच्या आसपास थांबून ड्यूटी करीत असतात, तर टवाळखोर इमारतीच्या चहुबाजूंनी कॉप्या पुरवण्याचे काम करीत आहेत. पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते गोंधळ घालतात. तोकड्या पोलिस बंदोबस्ताचा फायदा उचलत दररोज टवाळखोरांचे उपद्व्याप सुरूच आहेत. हे टवाळखोर शिक्षण विभागासह पोलिसांनाही डोईजड झाले आहेत. 
 
कॉपीप्रकरणी एकही कारवाई नाही 
शनिवारी दहावीचा इंग्रजी या विषयाचा पेपर झाला. अनेक केंद्रांमध्ये सर्रास कॉप्या चालल्या. कॉप्या पुरवण्याच्या कारणावरून शिवतीर्थ मैदानावर मारहाणही झाली. मात्र, जळगाव शहरातील एकाही केंद्रात कॉपीची कारवाई झाली नाही. तथापि, यावल तालुक्यात ६, भडगाव तालुक्यात १०, भुसावळ तालुक्यात अशा एकूण १९ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...