आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corporation Negligent, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडाचे झाड वीजतारांवर पडले; 152 घरातील टीव्ही, फ्रीज, मीटर जळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नूतन वर्षा कॉलनीत गटार बांधण्यासाठी खोदकाम करताना निष्काळजीपणे वडाच्या झाडाचे मूळच कापले गेल्याने झाड उच्चदाबांच्या वीज तारांवर कोसळले. त्यामुळे उच्चदाब वाढून मोहननगर परिसरातील 150 घरांमधील 100 वीजमीटरांसह व टीव्ही, फ्रीज, संगणक असे एकूण 152 उपकरणे जळून खाक झाले आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर क्रॉम्प्टन कंपनीनेही या घटनेतून अंग काढून घेत महापालिकेकडे बोट दाखविले. याप्रकरणी कुठेही दाद मिळत नसल्याने नुकसानभरपाईसाठी नागरिकांनी अखेर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच झाड तोडणार्‍या कर्मचार्‍यांविरुद्ध क्रॉम्प्टनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.
मोहननगरातील सिद्धिविनायक मंदिरासमोर शुक्रवारी मनोज पाटील यांच्या घराला लागून असलेल्या गटारीचे काम महापालिकेतर्फे सुरू होते. दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास कंत्राटदाराचे कर्मचारी या गटारीचे काम करीत होते. गटार खोल करताना पायरीला लागून असलेल्या वडाच्या झाडाची मुळे छाटली गेली. त्यामुळे डेरेदार वृक्ष समोरील बिल्डिंग व एचपी लाइनच्या वीजवाहिनीवर कोसळले. परिणामी, तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने विजेचा दाब वाढून स्फोट झाला. त्यामुळे नूतन वर्षा कॉलनी, मोहननगर व चैत्रबन कॉलनीतील मनोज पाटील, डी.के.वाणी, वसंत फांदे, दीपक पाटील, महेश शर्मा, लक्ष्मण नेरकर, एस.एल.फुसे, ल.तु.बारी यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज व संगणकासह वीजमीटर खाक झाले.
भरपाई कोण देणार ?
झाड अचानक वीजवाहिनीवर कोसळल्याने मोठा स्फोट झाला. सुदैवाने या वेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, वीज उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ते कोण भरून देणार? हा प्रश्न आहे. मनपा व क्रॉम्प्टनकडून जबाबदारी टाळली जात आहे. रतन थोरात, नुकसानग्रस्त ग्राहक

30 हजारांचे नुकसान
घरात संगणकावर काम करीत असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन संगणकासह फ्रीज व इलेक्ट्रिक बोर्ड जळून 30 हजारांचे नुकसान झाले. हे नुकसान कोण भरून देणार? महापालिका व वीज कंपनीने याबाबत हात वर केले आहेत. मनोज पाटील, नुकसानग्रस्त ग्राहक
मी घटनास्थळाला भेट दिली आहे. वडाचे झाड जीर्ण झाल्यामुळे ते पडले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. सुशील साळुंखे, विद्युत विभागप्रमुख, मनपा

या परिसरात भारनियमनाची वेळ संपूनही वीजपुरवठा खंडित होता. याविषयी नागरिकांनी क्रॉम्प्टन कंपनीकडे तक्रार केली होती. यानंतर दुपारी 12 वाजता वीजपुरवठा सुरू झाला अन् 15 मिनिटांनीच ही घटना घडली. त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत या घटनेची माहिती क्रॉम्प्टनला दिली. कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले खरे; पण झाड कोसळल्याने ही घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आधक्ष पंचनाम्यांची प्रतीक्षा केली. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत या भागातील वीजपुरवठा खंडितच होता. दरम्यान, माजी महापौर किशोर पाटील यांनी पाहणी करून संतप्त नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.