आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका कर्मचा-यांची पदोन्नती फेरमान्यतेसाठी हालचाली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेतील 43 कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्या अंतर्गत कुरघोडींमुळे दीड वर्षापासून रखडल्या आहेत. वादावर तोडगा काढण्यात आला असून पदोन्नत्यांना आडकाठी घालणार्‍यांची समजूत घातल्यानंतर पदोन्नत्यांच्या विषयाला फेरमान्यता देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. आस्थापना विभागातर्फे पदोन्नतीच्या टिपणी तयार करण्यात आल्या असून जिल्हाधिकार्‍यांकडे हा विषय रवाना केला जाणार आहे.

पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदोन्नतींचा विषय दीड वर्षापासून रखडला होता. यावर तोडगा काढण्यासाठी प्रभाग अधिकारी उदय पाटील यांनी पुढाकार घेतला होता. या प्रक्रियेविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा देणार्‍यांची समजूत काढून त्यांच्याकडून संमतीपत्र लिहून घेण्यात आले आहे. पदोन्नतींना सर्वांची नाहरकत असल्याचे प्रकरण तयार करून उपायुक्तांच्या माध्यमातून आस्थापना विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आस्थापना विभागाने सर्वांची संमती असल्यास पदोन्नत्यांना अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. पदोन्नतींसाठी सत्ताधारीही कर्मचार्‍यांसोबत आहेत. आस्थापना विभागातर्फे पदोन्नतींसंदर्भातील टिपणी तयार केली असून जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वी 20 जानेवारी 2012 रोजी घेतलेल्या विभागीय पदोन्नती समिती बैठकीच्या वृत्ताला फेरमान्यतेचा विषय मंजूर होताच नवीन आर्थिक वर्षात कर्मचार्‍यांना पदोन्नत्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

वादग्रस्त कर्मचार्‍यांची सशर्त तयारी
स्थानिक संस्था कर विभागातील ‘लाभाचे पद’ मानले जाणारे ‘एलबीटी अधीक्षक’पद आस्थापना सूचीवर नाही. त्यामुळे हे पद तूर्त रिक्त ठेवण्यात यावे. पदोन्नती देताना माझी वर्णी समकक्ष पदावर लावण्यात यावी. अशा पद्धतीने निर्णय झाल्यास इतरांच्या पदोन्नतीला माझा विरोध नसल्याची अट एलबीटी कर अधीक्षक राजेंद्र पाटील यांनी टाकली आहे, तर पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अनिल नाटेकर यांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याच्या अटीवर लिपिकपदावर पदोन्नती देण्याची अट टाकली आहे.


इतरांनाही मिळणार लाभ
महापालिकेतील 43 कर्मचारी गेल्या वर्षी पदोन्नतीस पात्र होते. वर्षभरात यातील आठ कर्मचारी निवृत्त झाले आहेत. उर्वरित कर्मचार्‍यांच्या पदोन्नती झाल्यावरही अजून 12 पदांवर इतरांना पदोन्नतीची संधी आहे. पात्र असलेल्यांना त्या पदांवर सामावून घेता येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना सोमवारी देण्यात येणार्‍या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.