आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation Schools In Jalgaon, Lateat News, Divya Marathi

पालिकेच्या उर्वरित शाळाही संस्थांना देण्याच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विद्यार्थीसंख्या घटल्याचे कारण पुढे करीत पालिकेच्या शाळा खासगी संस्थांना चालविण्यास देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या मुद्यावर झालेल्या चर्चेत आयुक्तांनीही सहमती दर्शविली आहे. या संदर्भात धोरण निश्चिती करण्यात येऊन प्रायोगिक तत्त्वावर काही शाळा चालविण्यास देण्याची मागणी सत्ताधारी गटाकडून झाली. मनसेच्या नगरसेवकांनी या मुद्याला विरोध केला.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा पीठासिन अधिकारी नितीन लढ्ढा यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. या बैठकीस आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी नगरसचिव गोपालसिंग राजपूत होते. शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय वाणी यांनी पटपडताळणी संदर्भात दिलेल्या अहवालाचा संदर्भ देत नितीन लढ्ढा यांनी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या अत्यंत कमी झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली. कागदोपत्री 6843 विद्यार्थी दाखविण्यात आले असून प्रत्यक्षात 4546 विद्यार्थी छायाचित्रणात आढळून आले आहेत, असे सांगितले.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पालिकेच्या शाळांपैकी दोन-तीन शाळा प्रायोगिक तत्त्वावर काही संस्थांना चालविण्यास देण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर स्थायी समिती सदस्य रमेश जैन यांनी प्रायोगिक तत्त्वावर दोन-तीन शाळांसंदर्भात प्रस्ताव तयार करण्याची सूचना सभेत मांडली.
पालिकेच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देऊन इमारत देखभाल-दुरुस्ती संबंधित संस्थेकडे ठेवण्यासह इतर काही अटी-शर्ती टाकून एखादा प्रस्ताव तयार करण्याचा मुद्दा मांडला. मनसे सदस्य मिलिंद सपकाळे, लीना पवार यांनी या मुद्याला विरोध केला. खासगी संस्थांना दिल्यावर नंतर या संस्था गरिबांच्या मुलांना विनामूल्य शिक्षण देत नाही. नियम व अटींचे पालन होईलच याची शाश्वती नसते. आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रायोगिक तत्त्वावर शाळा चालविण्यास देण्यास काय हरकत आहे, सांगत या मुद्याला सहमती दर्शविली. समांतर रस्त्यांच्या मुद्यावर मनसे सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. तसेच अश्विनी देशमुख यांनी रेती वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली.