आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्‍ये सहा नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नगराध्यक्ष पदासाठी अख्तर पिंजारी यांना हात उंचावून मतदान करावे, अशा आशयाचा व्हीप राष्ट्रवादीचे गटनेते हाजी नईमखॉं सिद्दीकखॉँ यांनी त्यांच्या 25 नगरसेवकांना बजावला होता. मात्र, यापैकी स्वत: उमेदवारी दाखल केलेले युवराज लोणारी, शोभा नाटकर, राजेंद्र आवटे, उदय मुक्तीप्रसाद सिंह अशा चार जणांनी गटनेत्यांचा व्हीप मोडला आहे. भाजपनेही युवराज लोणारी यांना मतदान करण्यासाठी 11 नगरसेवकांना व्हीप बजावला होता. मात्र, यापैकी भावना अजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे अख्तर पिंजारी यांना मतदान केले. तर अजय भोळे यांनी तटस्थतेची भूमिका घेतली. या दोघांनीही गटनेत्यांचा व्हीप झुगारला आहे. त्यामुळे आता कायद्याची लढाई सुरू होईल.
गटनेत्यांचे अधिकार आहेत सर्वश्रेष्ठ

पालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीचे 25 व भाजपचे 11 अशा दोन्ही पक्षांनी आपापल्या नगरसेवकांचा नगरपरिषदेतील गट तयार करून महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 च्या तरतुदीनुसार आणि नियम 1987 चा नियम 3 आणि 4 नुसार जिल्हाधिकार्‍यांकडे नोंदणी केली आहे. त्यानुसार गटनेत्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना, पक्षादेश पालन करणे गटातील नगरसेवकांना बंधनकारक आहे. पक्षादेशाचे उल्लंघन झाले तर संबंधित नगरसेवकांचे सदस्यत्व अपात्र होऊ शकते, असे हा नियम सांगतो. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीत गटनेत्यांचा पक्षादेश झुगारणार्‍या सहा नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
अख्तर पिंजारींना विरोध नव्हताच
अख्तर पिंजारी, जलील कुरेशी यांच्या नावाला विरोध नव्हताच. त्यांना आमच्या गटाकडून ऑफरही दिली. तरन्नुम इद्रीस साध्याभोळ्या गृहिणी असून त्यांच्या नावाचा वापर करून फसवणूक झाली असती. बेकायदेशीर कामांना चाप बसावा, यासाठी आम्ही युवराज लोणारींचे नाव पुढे केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. लोकशाहीत जय- पराजय पचवण्याची ताकद आहे. संजय सावकारे, पालकमंत्री
शहराचा सर्वांगिण विकास हाच अजेंडा
व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांच्या अडचणी सोडवू. शहरातील सर्वच प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. सवर्पक्षीय नगरसेवकांना समान वागणूक देऊ. आगामी अडीच वर्षांच्या कार्यकाळात भरीव विकास कामे करू. सर्वसामान्य जनतेच्या मनात पालिकेसंदर्भात आदर निर्माण करू. विकास हाच आमचा अजेंडा असेल, अशी ग्वाही नगराध्यक्ष अख्तर पिंजारी व उपनगराध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली.
उपनगराध्यक्षपदी विजय चौधरी
उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान अर्ज भरण्याची मुदत होती. या पदासाठी राष्ट्रवादीचे विजय चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. पालकमंत्री संजय सावकारे यांच्या गटाकडून त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पीठासिन अधिकारी विजय भांगरे यांनी विजय चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.