नाशिक - कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या अभियानाचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवकांनी अधिका-यांना धारेवर धरीत खड्डे बुजविण्याची मागणी केली. खड्डे बुजवण्यासाठीच्या मुरुमातही भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप करण्यात आले.
स्थायी समितीची बैठक सभापती राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. त्यावेळी नगरसेविका अर्चना थोरात यांनी रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, त्याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे खड्डे प्राधान्याने बुजवण्याच्या सूचना विभागीय अधिका-यांना देण्यात आल्या. खड्डे बुजवण्यासाठी शहरात एकच कंत्राटदार कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंदना बिरारी यांनी वर्तमानपत्रात खड्ड्यांविषयी सुरू असलेल्या मालिकेकडे लक्ष वेधत नैसर्गिक नाले बुजवल्याने चेंबर तुंबून पाणी रस्त्यांवर येत असल्याचे सांगितले.
नाले बुजवून प्रकल्पांना मंजुरी देणा-या नगररचना विभागावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. प्रा. कुणाल वाघ यांनी दरवर्षी खड्ड्यांची संख्या तितकी कशी राहते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले. जास्तीत जास्त खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम खात्याने दक्ष राहिले पाहिजे. आजघडीला बांधकाम खात्यामार्फत ज्या ठेकेदारांवर खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिली, त्यांच्याकडून अर्धा ट्रॅक्टर मुरूम आणल्यावर एकाचा हिशेब लावून गैरप्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गढूळ पाणीपुरवठा
अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नगरसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा एकदा नगरसेवकांना विश्वासात घेऊन ठरवावे, असे आदेश सभापती ढिकले यांनी दिले. वंदना बिरारी यांनी सिडकोत पाणी अनियमितपणे येते अशी, तर शोभा आवारे यांनी नाशिकरोड भागात हीच समस्या असल्याचे सांगितले. प्रा. कुणाल वाघ यांनी गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले.
रस्ते दुरुस्तीसाठी आता कोल्डमिक्सचा उपाय
‘दिव्य मराठी’ने हाती घेतलेल्या खड्डा अभियानास शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर अॅड. यतिन वाघ यांनी गुरुवारी सकाळी गंगापूररोड परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यांच्या कामासोबतच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश त्यांनी दिले. पावसाने उघडीप दिल्यानंतर खड्ड्यांवर कोल्डमिक्स मटेरियलचा रामबाण उपाय करण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
नगरसेवक विलास शिंदे यांनी बुधवारी महापौरांची भेट घेऊन गंगापूररोड रस्त्याच्या कामाबाबत तक्रार केली होती. त्यानुसार, गुरुवारी महापौरांनी विलास शिंदे यांच्यासह या रस्त्याची पाहणी केली. या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी नगरसेवक शिंदे यांना दिले.
मुरुमाचा वापर
सध्या पाऊस सुरू असल्याने मुरूम व माती टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर हे खड्डे डांबर मिश्रणाने बुजविण्यात येतील. पुन्हा खड्डे होऊ नयेत म्हणून खर्चिक असले तरी कोल्डमिक्स मटेरियलने खड्डे बुजविण्यात येतील. अॅड. यतिन वाघ, महापौर
निकृष्ट दर्जाचे काम
- गंगापूररोड हा ‘मॉडर्न रोड’ करण्याचा मानस आहे. मात्र, या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले. महापौरांकडे याबाबत तक्रार केली होती. महापौरांनी या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. -विलास शिंदे, नगरसेवक