आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बॅँकेच्या भरतीत गैरव्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा बॅँकेतील कर्मचारी भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. परीक्षार्थींची मेरिट लिस्ट प्रसिद्ध न करता थेट मुलाखती घेण्यात आल्या. यात पैसे देणा-या उमेदवारांची निवड करून गुणवंत उमेदवारांना डावलण्यात आले आहे. या गैरव्यवहाराबाबत अध्यक्ष चिमणराव पाटील यांच्याविरोधात पुराव्यासह न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बॅँकेच्या आरक्षित 35 जागांसाठी एमकेसीएलमार्फत परीक्षा घेण्यात आली. यात मेरिटमध्ये असलेल्या उमेदवारांची यादीच प्रसिद्ध झाली नाही. एमकेसीएलमार्फत केवळ लेखी परीक्षेद्वारेच उमेदवारांची भरती व्हावी, मुलाखती घेण्याची गरज नाही. मुलाखतीद्वारे गैरव्यवहाराला संधी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. मुलाखतीचे 50 गुण बॅँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी स्वत:कडे राखीव ठेवले होते. त्यातच सारा गोंधळ होत असून पैसे देणा-या उमेदवारांचीच निवड केल्याचे पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध करु, तसेच या जागांमध्ये काही वाटा मिळेल, या प्रतीक्षेत असलेले बॅँकेचे संचालक मूग गिळून गप्प आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटलांनी दडपले घोटाळे
बॅँकेत संगणक घोटाळ्यासह अनेक घोटाळ्यांची चौकशी झाली आहे. चौकशी होऊनही एकाही प्रकरणात कारवाई झालेली नाही. सहकारमंत्र्याकडून प्रकरणे दडपली जात असल्याचेही बाळासाहेब पाटील सांगितले. भरतीसह सर्व प्रकरणांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली. सहकार आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह, केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे फॅक्स पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोप वैयक्तिक द्वेषापोटी
माझ्यावर झालेले आरोप वैयक्तिक द्वेषापोटी करण्यात आले आहेत. नाबार्डच्या धोरणाप्रमाणे बॅँकेत कर्मचा-यांची भरतीप्रक्रिया राबवली आहे. निवड समितीचा चेअरमन या नात्याने मी मुलाखती घेऊ शकतो. कर्मचारी भरतीचे श्रेय मला मिळू नये म्हणून त्यांनी आरोप केले आहेत. भरती पारदर्शकच आहे.
आमदार चिमणराव पाटील,
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक