आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5200 रुपये भाव, तरीही कापसाचा तुटवडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- जानेवारीत 4800 रुपये असलेला कापसाचा भाव फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात 5200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तरीही जिनिंग व्यावसायिकांना गाठी तयार करण्यासाठी कापूस मिळेनासा झाला आहे. परिणामी जिल्ह्यात जिनिंग उद्योग संकटात सापडले आहेत.

देशांतर्गत बाजारपेठेतून कापूस गाठींची वाढलेली मागणी आणि कापसाची कमी झालेली आवक पाहता, कापसाचे भाव वाढतील, ही शक्यता जानेवारीमध्ये ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम वर्तवली होती. यानुषंगाने झालेल्या हालचालींनुसार 4200 क्विंटल कापसाचे भाव 4800 पर्यंत वधारले. या भावांमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा 400 ते 450 रुपयांनी वाढ झाली आहे. अजून भाववाढ होईल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेला कापूस बाजारपेठेत विक्री करणे टाळले आहे. या सर्व घडामोडींचे परिणाम खान्देशातील जिनिंग प्रेसिंग उद्योगांवर झाले आहेत. कापूस गाठी तयार करणार्‍या 180 पैकी सद्यस्थितीत जेमतेम 50 टक्के उद्योगांमध्ये एका पाळीवर काम सुरू आहे. अशाही अनुकूल परिस्थितीत जिल्ह्यात 15 लाख कापसाच्या गाठी तयार करून त्यापैकी चार लाख गाठींची पाकिस्तान, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हीएतनाममध्ये निर्यात झालेली आहे. 356 किलो वजनाच्या दोन गाठींची किंमत बाजारात 42 हजार 500 रुपये एवढी आहे.

दरवर्षी 30 लाख गाठी तयार होतात
कापसाचे उत्पादन पाहता जिल्ह्यातील जिनिंग कारखान्यांमध्ये दरवर्षी 30 लाख कापूस गाठी तयार होतात. मात्र, येऊ घातलेल्या निवडणुका पाहता शेतकर्‍यांना पुन्हा भाववाढीची अपेक्षा असल्याने ते साठवून ठेवलेला कापूस बाजारात आणण्यास तयार नाहीत.

खर्च जास्त, उत्पन्न कमी
शेतकर्‍यांकडील कापूस खरेदी करताना सरकीसहित खरेदी करावा लागतो. या कापसातील सरकी वेगळी करून गाठी तयार करण्याचा खर्च वाढला आहे. या मुळे व्यावसायिकांची अवस्था खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी झाली आहे. प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन, जळगाव