आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - भारत-पाकिस्तान सिमेवर तणाव निर्माण झाल्याने कापूस गाठींच्या निर्यातीवर अघोषित बंदी आली आहे. याचा फटका कापूस व्यापाराला बसला आहे. दुसरीकडे खासगी व्यापारी, शासनाने ठरवून दिलेला हमीभाव देण्यास तयार नसल्याने अनेकांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे.
यंदा कापसाचे उत्पादन घटले आहे. परदेशातून होणारी मागणी पाहता किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. उत्पादन घटल्याने हंगामाच्या सरतेशेवटी भाव वाढतील, या आशेवरसुद्धा पाणी फिरले. आता जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या दरात तीन टक्क्य़ांनी झालेली घट आणि भारत-पाकिस्तान सिमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत सद्य:स्थितीत चीन, बांगलादेशातून कापूस गाठींची मागणी घटली आहे. पाकिस्तानात होणारी कापूस गाठींच्या निर्यातीवरील बंदी उठण्याची आशासुद्धा धुसर झाली आहे. या घडामोडींचा कापसाच्या भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे. सद्य:स्थितीत खासगी व्यापारी चार हजार रुपयांपेक्षा जास्त भाव देण्यास तयार नाहीत. यंदा कापूस हमीभावाने शेतकर्यांची निराशा केली. केवळ 3950 रुपये भाव जाहीर झाल्याने खासगी व्यापार्यांनी हात आखडता घेतला. यामुळेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दोन महिन्यापूर्वी सुरू केलेल्या खरेदी केंद्राकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली. भारतात तयार झालेल्या कापूस गाठींपैकी पाकिस्तानमध्ये किमान 15 लाख, चीन 75 ते 80 लाख, बांग्लादेश 18 ते 20 लाख गाठींची दरवर्षी निर्यात होते. मात्र, यावर्षी चीनने मागणीच्या कोट्यात कपात केल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे.
गुंतवणकीचा प्रश्न गंभीर
परदेशातून कापूस गाठींची मागणी घटली आहे. भारत-पाकिस्तान सिमेवरील तणावाची स्थिती पाहून व्यावसायिक रिस्क घेण्यास तयार नाहीत. गुंतवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदीप जैन, सल्लागार सदस्य, ऑल इंडिया जिनिंग प्रेस
50 हजार गाठी तयार
कापसांच्या गाठींची पाहिजे त्याप्रमाणात मागणी नसल्याने जिल्हाभरात सरासरी 50 हजार गाठी तयार होवून पडल्या आहेत. मागणीनुसार त्याचा पुरवठा केला जातो. कापसाच्या उत्पादन व मागणीमुळे यावर्षी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अरविंद जैन, महावीर जिनिंग प्रेस, बोदवड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.