आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी सैराट आहे, शोधू नका...’ , चिठ्ठी लिहून आर्चीचे पलायन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘मी सैराट आहे... माझा शोध घेऊ नका,’ असा धक्कादायक मजकूर लिहिलेली चिठ्ठी पालकांसाठी सोडून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी दुपारी घरातून पलायन केले.परीक्षा असल्यामुळे नेहमीचा रिक्षाचालक तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी घरी आला त्या वेळी ही गोष्ट उघडकीस आली. आई-वडीला घरात नसल्याची संधी साधून जळगावच्या या आर्चीने घराबाहेर पडताना संशय येऊ नये म्हणून शेजारच्या रहिवाशांना आत्याकडे जात असल्याची थाप मारली आणि कपडे, तीन हजार रुपये घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजेे घरातून पळून जाण्याची या मुलीची वर्षभरातील ही दुसरी वेळ असून यापूर्वी तिला पोलिसांनी विदर्भातून शोधून आणले होते. 

‘सैराट’चित्रपटानंतर आर्ची-परश्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून तरुणाई सैराट झाल्याची अनेक उदाहरणे राज्यभरात घडली आहेत. तोच प्रकार आता शुक्रवारी जळगावात घडला. राधाकिसन वाडीतील एका शाळेमधील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीने पलायन केले. आर्ची (नाव बदलेले अाहे) हिचे आई-वडील सकाळी ९.३० वाजता कामानिमित्त घराबाहेर गेले हाेते. त्यानंतर दुपारी ११ वाजता आर्चीला शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्षाचालक घरी अाला. परंतु ती घरी नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकाने तिच्या वडिलांना फोन करून माहिती दिली.
 
तसेच शेजारच्यांकडे तपास केला पण ती सापडली नाही. वडिलांनी घरी येऊन चौकशी केली. तेव्हा जळगावच्या या आर्चीने घरातून दोन ड्रेस, एक नाइट ड्रेस, एक बॅग सुमारे तीन हजार रुपये घेऊन पलायन केल्याचे निष्पन्न झाले. याच वेळी वडिलांना तिने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. यात ‘मी सैराट आहे... मला शोधू नका,’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेला हाेता,अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.त्यामुळे ही मुलगी स्वत:हूनच घरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पालकांनी तक्रार दिल्यानंतर शहर ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेजाऱ्यांची दिशाभूल 
आई-वडीलघरी नसताना आर्चीने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. कपड्यांची बॅग घेऊन घराबाहेर पडणार असल्याने शेजारच्या रहिवाशांना शंका येऊ नये म्हणून तिने आत्याकडे जात असल्याचा बहाणा केला. त्यानंतर रिक्षाचालक घरी येण्याच्या आधीच घर सोडून निघून गेली. दरम्यान, शुक्रवारी तिचा पेपरही होता. परीक्षेची तयारी म्हणून घरातून लवकर जात असल्याचे शेजारच्यांना तिने भासवले होते. 
 
गेल्यावर्षी एलसीबीने विदर्भातून आणले 
गेल्या वर्षीदेखील आर्ची घरातून निघून गेली होती. त्या वेळी पोलिसांनी तपास केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिचा शोध घेऊन तिला विदर्भातून जळगावला आणले होते. त्यानंतर ती पुन्हा नियमित शाळेत जात होती. 
 
 
कपडे, हजार रुपयांसह दहावीतील मुलीचा पोबारा 
 
आई-वडील बाहेर गेल्याची दुपारी साधली संधी 
 
रिक्षाचालक शाळेत नेण्यास आल्यानंतर घटना उघडकीस 
 
घरातून पळून जाण्याची मुलीची ही दुसरी वेळ