आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस उप अधीक्षकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याबाबत प्रोसेस इश्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा - खोट्या गुन्ह्यात अडकवून मारहाण केल्याप्रकरणी अडावद येथील गोपीचंद हरी कोळी यांनी दाखल केलेल्या खटल्यात अडावदचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक कोलते, उप विभागीय पोलिस अधिकारी मोहन मोहाडीकर, पोलिस कर्मचारी हेमंत जोगी, सुभाष पाटील यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चोपडा न्यायालयाने प्रोसेस इश्यू केले आहे. तसेच 11 सप्टेंबर रोजी संबंधित चौघांनी न्यायालयात हजर राहाण्याचेही आदेशात म्हटले आहे.

गोपीचंद कोळी यांनी अडावदमधील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांना निवेदन दिले होते. यामुळे संबंधित अवैध धंदेवाल्यांना राग येऊन त्यांनी गोपीचंद कोळी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. या घटनेवरून अडावद पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हा दाखल केला. मात्र गोपीचंद कोळी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून 25/10/2012 रोजी लॉकअप मध्ये टाकले. त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी अडावदचे सहायक पोलिस निरीक्षक कोलते, उप विभागीय पोलिस अधिकारी मोहाडीकर व दोघा पोलिस कर्मचार्‍यांनी पुन्हा मारहाण केली. मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गोपीचंद कोळी व राधेश्याम कोळी यांनी धमकीमुळे न्यायालयात काहीही सांगितले नाही. दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. नंतर गोपीचंद कोळी यांनी चोपडा येथे उपचार घेतल्यानंतर आपल्यावरील अन्यायासंदर्भात चोपडा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले, वरिष्ठ पोलिस अधिकारी, गृह सचिव आदींना निवेदने दिली. मात्र उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मोहाडीकरसह चौघांविरुद्ध अँड. धर्मेंद्र सोनार यांच्यामार्फत चोपडा न्यायालयात खटला (क्र. 604 / 2012) दाखल केला. या खटल्यात फिर्यादीचे म्हणणे ग्राह्य धरून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर प्रोसेस इश्यू करण्याचा आदेश न्यायाधीश जयंत पांचाळ यांनी दिला.